पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. संबंधित प्रकरणावर सर्वसामान्य नागरिकांकडून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली. देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तलयात दाखल झाले. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. अपघाता प्रकरणी कलम 304 लावण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पण काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पोलिसांच्या एफआयआरची पहिल्या कॉपीचा फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केले आहेत. रविंद्र धंगेकरांच्या या प्रश्नांनतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. या दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
“काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही. अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय आणि तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती”, असा दावा रविंद्र धंगेकर यांनी केलाय.
“२) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन आणि बिल्डरला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का?”, असे प्रश्न रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केले आहेत.
काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत.
१) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी… pic.twitter.com/2fbc73RvBo— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 22, 2024
“आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे. अधिकारी, मंत्री तर निघून जातील. पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यंपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल”, असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविंद्र धंगेकर यांचं ट्विट रिट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. मुळात पहिल्या FIR मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत आहे. घाटकोपर प्रकरणी SIT नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी. आणि पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी. पहिल्या FIR मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे?”, असे प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.