पुण्यात ज्याठिकाणी मद्यधुंद अवस्थेत एका बिल्डरपुत्रानं दोघांना चिरडलं त्याचठिकाणी काँग्रेस राज्यस्तरिय खुली निबंध स्पर्धा लिहून व्यवस्थेचा उपरोधिकपणे निषेध नोंदवला. अनेकांनी या निंबध स्पर्धेच्या आंदोलनात सहभागी होऊन निषेध व्यक्त केला. आणि उत्तम निबंध लिहिणाऱ्याला ११ हजारांचं पारितोषिकही ठेवलं गेलं. निंबधांचे विषय होते,
माझा बाप बिल्डर असता तर….?, विषय दुसरा- मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर…?, विषय तिसरा- माझी आवडती कार ( पोर्शे, मर्सिडिज, फरारी की इतर?), विषय चौथा- दारुचे दुष्परिणाम, विषय पाचवा- अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?.
19 मे रात्री मद्यधुंद अवस्थेत बिल्डर विशाल अग्रवालच्या मुलानं दोन तरुणांना चिरडलं. अपघातावेळी बिल्डरपुत्राची पोर्शे कारचा वेग ताशी २०० किलोमीटर होता. याप्रकरणात पोलिसांनी जाणून-बुजून आरोपीची सुटका होईल, अशी कलमं लावल्याचा आरोप झाला. कोर्टानं अल्पवयीन आरोपीला अपघातावर ३०० शब्दात निबंध लिहिण्याची शिक्षा ठोठावून सुटका केली. यावरुनच सामान्य लोकांनी मोठा संताप व्यक्त करत मोहिम उघडली. परिणामी यंत्रणेवर दबाव वाढला, आणि आरोपीची रवानगी पुन्हा बालसुधारगृहात करावी लागली. बड्या बापाचा मुलगा फक्त 2 महिन्यांनी अल्पवयीन आहे म्हणून दोघांना चिरडल्याची शिक्षा फक्त 300 शब्दात निबंध लिहिण्याची असू शकते का? यावरही प्रश्न उभे राहिले.
सोशल मीडियात लोकांनी सामान्य लोकांना आवाहन केलं की, सामान्यांनी रस्त्यावरुन सुरक्षित चालावं. नाहीतर तुमच्यामुळे कुणाचा तरी बहुमुल्य वेळ निबंध लिहिण्याच्या शिक्षेनं बर्बाद होऊ शकतो. लोकांनी विजय मल्ल्याचा फोटो ट्विट करुन म्हटलं की, मी सुद्धा पुण्याच्या धर्तीवर भारतात परतायला तयार आहे. फक्त मलाही ३०० शब्दात ‘कर्ज कसं माफ करावं’ यावर निबंध लिहिण्याची शिक्षा मिळावी.
अभिनेता ऋषीकेश जोशीनं म्हटलं की, किमान निबंधात कमी मार्क मिळाल्यास तरी तुरुंगात घालण्याचा
एखादा कायदा करायला हवा. कुणी म्हटलं की तो ३०० शब्दातला निबंधही एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यानेच लिहून दिला पाहिजे. इतकी कठोर शिक्षा त्या बिचाऱ्याला देणं अन्याय ठरेल. काहींनी म्हटलं की ही खरोखर 2 जणांना गाडीखाली चिरडल्याची शिक्षा आहे की मग उन्हाळ्यातील सुट्टीचा अभ्यास? तर कुणी बॅनर लिहून पुण्यात अपघातास मनाई नाही, फक्त अपघाताआधीच ३०० शब्दातील निबंधाचा कागद गाडीत ठेवावा, असं आंदोलन केलं.
कायदा कायद्याचं काम करतो. मात्र अशा घटनांमधल्या विसंगतीवरुन लोकांचा संताप उफाळून येतो. म्हणजे जेव्हा बिल्डरपुत्रानं एक तरुण आणि तरुणीला चिरडलं, तेव्हा त्यांच्या नातलगांना शवविच्छेदन करुन मृतदेहही मिळाले नव्हते.
त्याच्याआधी आरोपीची सुटका झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे अपघातानंतर दोन्ही मृतदेहांचं शवविच्छेदन झालं, त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळगावी म्हणजे मध्य प्रदेशातल्या जबलपूर पोहोचले. त्यांचा अंत्यविधीही झाला. आज घटनेला ८ दिवसही लोटले. पण अद्यापही आपल्या पुणे पोलिसांना आरोपीच्या रक्ताचे ब्लडरिपोर्ट मिळवता आलेले नाहीत.
जेव्हा व्यवस्थाच सामान्यांचा उपरोध करते, तेव्हा त्यालाही उत्तर उपरोधानंच दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया निबंध लिहणाऱ्या पुणेकरांची होती.