प्रदीप कापसे, पुणे : भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच निवडणूक लागणार आहे. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असताना काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.
काय म्हणाले होते अजित पवार
पुणे लोकसभेच्या जागेवर अजित पवार यांनी दावा केला होता. आठवड्याभरापूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते की, पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, त्यानुसार या जागेचा निर्णय होईल. परंतु शनिवारी मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
काँग्रेसचे काय ठरले
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची जागा काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांचे यासंदर्भात एकमत झाले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. शहराध्यक्षांना पक्ष संघटनात्मक तयारी करण्याच्या सूचना दिल्या. पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसचं लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठीही तयारी करण्याचे आदेशही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
विधानसभा दिली लोकसभा द्या
विधानसभेची जागा काँग्रेसला दिली. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेवेळी कसब्यात खूप काम केलं आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद देखील जास्त आहे. यामुळे ही जागा राष्ट्रवादीला द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होती.
भाजपची तयारी सुरु
लोकसभा पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहे.