पुणे | 29 जुलै 2023 : पुणे शहरात उद्योग उभे राहिले. शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या. यामुळे पुणे शहराचा विकास चौफेर झाला. बाहेरुन पुणे शहरात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे सर्वात जास्त वाहने पुणे शहरात आहे. दुचाकीचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. यामुळे पुणे शहरात कोंडींचा प्रश्न आहेच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा व्हिडिओ ट्विट केला. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी पुन्हा चर्चेला आहे.
पुणे शहरातील सर्वात मोठा रस्ता असलेला सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी नियमित झाली आहे. या रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह दरम्यान उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. २.७४ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपुल आहे. त्याची रूंदी १६.३ मीटर आहे. या पुलाच्या कामास सुरुवात गेल्या दीड वर्षांपूर्वी झाली. परंतु अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही.
पुणे शहरातील वाहतुकीची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असून नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सूस ते नांदे दरम्यानची ही वाहतूक कोंडी पुण्यातील वाहतूक कोंडीचे चित्र स्पष्ट करते. पुणे महापालिका आणि पुणे शहर पोलिस यांनी यावर तोडगा काढावा.… pic.twitter.com/FesnT83Tr4
— Supriya Sule (@supriya_sule) July 28, 2023
सिंहगड रोड हा वर्दळीचा रस्ता आहे. या ठिकाणावरुन दररोज १ लाख २५ हजार वाहने ये-जा करतात. पुलाच्या कामामुळे कॅनल रस्त्याचा पर्याय तयार केला आहे. परंतु वाहनांची संख्येमुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते. तसेच पुलाच्या कामासाठी क्रेन, ट्रॅक्टर, मिक्सर ही अवजड वाहने जात असतात. त्यामुळे या रस्त्यावर खडे निर्माण झाले आहे. सिंहगड रस्त्यावरुन एक ते दीड किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासाचा कलावधी लागत आहे.
सिंहगड रोडवरील पुलाचे काम दीड वर्षापासून सुरु आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता नाही. सिंहगड रस्त्याची दुरवस्था आणि सतत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 15 आदर्श रस्ते पुणे महानगरपालिकेने केले आहे. त्या रस्त्यांमध्ये सिंहगड रस्ताही आहे. यामुळे आता येत्या पंधरा ते वीस दिवसांत या रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि अतिक्रमण हटवण्याचे काम होणार आहे.