अभिजित पोते, पुणे | 17 नोव्हेंबर 2023 : राज्यातील सत्तेत एकत्र असलेल्या अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुणे यांच्यात वाद सुरु झाला आहे. हा वाद पक्षीय पातळीवरचा नाही तर एका कार्यक्रमावरुन निर्माण झाला आहे. पुणे भाजपच्या माजी शहराध्यक्षांनी पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परंतु या कार्यक्रमास अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या कार्यक्रमास विरोध केला आहे. जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही, अशी पोस्ट जगदाळे यांनी करत कार्यक्रमास विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रवादी सोशल मीडिया काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे आहेत. त्यांनी गुरुवारी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात पुण्यामध्ये होत असलेल्या पंडित धीरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया फेसबुक पेजवर ‘जगद्गुरु संत तुकारामांच्या भूमीत असल्या भोंदू बाबांना थारा नाही’, अशी पोस्ट करत धीरेद्र शास्त्री यांचा फ्लेक्स पोस्ट केला आहे. यामुळे अजितदादा गट आणि भाजप सत्तेत एकत्र असताना अजितदादा गटाकडून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला जात आहे.
पुणे शहरात बागेश्वर धाम महाराज यांचा कार्यक्रम २० ते २२ नोव्हेंबर रोजी जगदीश मुळीक फाउंडेशनकडून आयोजित केला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष यांनी यासंदर्भातील बॅनर्स शहरात लावले आहे. हनुमान कथा सत्संग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच यावेळी बागेश्वर महाराजांचा दिव्य दरबारही भरणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुण्यात होणाऱ्या बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. एकीकडे कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपकडून होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडून कार्यक्रमाला विरोध होत आहे.