लोणावळा, पुणे : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या (Lonavala Gramin Police Station) हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गाईवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा हा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. लोणावळ्यातील कुसगाव येथे ही घृणास्पद घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 377 कलमाद्वारे एका 28 वर्षीय युवकाला अटक केली आहे. गाईच्या मालकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका 28 वर्षीय (रा. कुसगाव, साठेवस्ती, ता. मावळ) विकृतावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. तर या प्रकरणी सतीश दगडू काकरे (वय 26) यांनी तक्रार दिली.
घटनेची अधिक माहिती अशी, की सतीश कोकरे हे शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय ते करतात. त्यांच्याकडे गायीदेखील आहेत. मंगळवारी (दि 31) रात्री सतीश कोकरे यांनी नेहमीप्रमाणे गोठ्यातील गायींना चारा दिला. यानंतर ते घरात झोपायला गेले. दरम्यान, आरोपी हा रात्रीच्या सुमारास कोकरे यांच्या गायींच्या गोठ्यात शिरला. यावेळी त्याने कोकरे यांच्या गोठ्यातील एका गायीवर लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी गाय विव्हळली लागली.
रात्रीच्या वेळी गोठ्यातून गायीचा आवाज येऊ लागल्याने कोकरे कुटुंबीय जागे झाले. त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता, आरोपी हा गोठ्यातील गायीवर अनैसर्गिक कृत्य करताना आढळून आला. गायीच्या मालकाला पाहताच तो पळाला. थोड्या वेळानंतर तो पुन्हा तिथे आला. यावेळी कोकरे कुटुंबीय जागेच होते. कोकरे यांनी आरोपीला ‘तू गोठ्यात काय करत होतास?’ असे विचारले, तेव्हा ‘मी काहीच केले नाही’, असे म्हणत तो त्यांच्याशी वाद घालू लागला. यावेळी त्याने त्यांच्याशी झटापटही केली. झटापटीनंतर पुन्हा तो पळून गेला. दरम्यान, या घटनेनंतर कोकरे कुटुंबीयांनी लोणावळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.