सर्व्हर ठप्प, ‘तहसील’बाहेर तुफान गर्दी; ‘ग्रामपंचायती’साठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गोंधळात गोंधळ

| Updated on: Jan 15, 2021 | 8:07 PM

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही गोंधळात गोंधळ सुरू आहे. तब्बल दोन तास महा ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा एकच बोजवारा उडाला. (crowd for gram panchayat election nomination in maharashtra)

सर्व्हर ठप्प, तहसीलबाहेर तुफान गर्दी; ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गोंधळात गोंधळ
Follow us on

पुणे: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही गोंधळात गोंधळ सुरू आहे. तब्बल दोन तास महा ऑनलाईन सर्व्हर ठप्प झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा एकच बोजवारा उडाला. त्यामुळे इच्छुकांनी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी धाव घेतल्याने तहसील कार्यालयाबाहेर एकच गर्दी झाली असून अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. (crowd for gram panchayat election nomination in maharashtra)

आज राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. गेल्या चार पाच दिवसांपासून ऑनलाईन अर्ज भरण्याचा गोंधळ सुरू असल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाईन फॉर्म भरण्याचीही मुभा दिली आहे. तसेच संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळही वाढवून दिली आहे. साडे पाच वाजेपर्यंत रांगेत असलेल्या सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे आज सकाळपासूनच इच्छुकांनी तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लावल्या. ऑफलाईन अर्ज बाद होऊ नये म्हणून अनेकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यावर भर दिला होता. पण दुपारी महा ऑनलाईन सर्व्हर दोन तासांहून अधिक काळ ठप्प झालं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. ही गर्दी नंतर ऑफलाईनकडे वळाल्याने अर्ज स्वीकारणाऱ्या यंत्रणांवर ताण आला होता. त्यामुळे अनेक तहसीलमधील काम ठप्प झालं होतं. अचानक झालेल्या गर्दीमुळे तहसील कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. सर्वच तहसील कार्यालयाबाहेर हे चित्रं दिसत होतं.

पुण्यात गोंधळात गोंधळ

पुण्यातील ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सर्व्हर डाऊन झाल्याने खोळंबली. त्यामुळे इच्छुकांच्या संतापाचा पारा चढला होता. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे इच्छुकांची पळापळ झाली. ऑनलाईन अर्ज भरता येत नसल्याने उमेदवारांनी लगोलग ऑफलाईन अर्ज पूर्ण भरून तो भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटेपासूनच केंद्रावर इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या. 16 पानी अर्ज भरताना नाकीनऊ आल्याने या उमेदवारांनी वेळ कमी पडू नये म्हणून वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

औरंगाबादमध्ये तहसील कार्यालयात तुफान गर्दी

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 618 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर एकच गर्दी झाली होती. कोरोनाची भीती न बाळगता अनेक उमेदवारांनी गर्दी केल्याने तहसील कार्यालयात पाय ठेवण्यासाठी जागाही उरली नव्हती.

मालेगावात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मालेगावमध्ये 99 ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याकरिता इच्छुकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा एक लाखांचं बक्षीस देतो असं पत्रं अशोक विठ्ठल देसले या जवानाने तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना लिहिलं आहे. अशोक देसले हे झोडगे गावचे असून सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुंबई शाखेत कार्यरत आहेत.

कोल्हापुरात कृषी महाविद्यालय अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी

कोल्हापुरात 433 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत असून आतापर्यंत 9 हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ही संख्या दहा हजारावर जाणार असल्याचं सांगण्यात येतं. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वेळेत अर्ज भरता यावा म्हणून इच्छुकांनी कृषी महाविद्यालय अर्ज स्वीकृती केंद्रावर मोठी गर्दी केली होती. मात्र, ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन अर्ज भरण्याचीही मुभा देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांनी समाधान व्यक्त केलं आहे. आज शेवटच्या दिवशी वेळ वाढवून दिल्यामुळे अर्जांची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

शहापूरमध्ये थंडा प्रतिसाद

शहापूर तालुक्यात एकूण 5 ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणीही अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली होती. दुपारपर्यंत चेरपोलीमधील 15 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी 34 अर्ज दाखल झाले. अल्याणी ग्रामपंचायतीसाठी 17, भावसे ग्रामपंचायतीसाठी 16, डोळखांब ग्रामपंचायतीसाठी 20 आणि दहिवली ग्रामपंचायतीसाठी 3 अर्ज दाखल झाले होते. या सर्व ग्रामपंचायतींची सदस्य संख्या 9 आहे. (crowd for gram panchayat election nomination in maharashtra)

कल्याणमध्ये कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता

कल्याण तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्याकरिता तहसील कार्यालयाबाहेर आज एकच गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा खोळंबा उडाला. त्यामुळे पोलिसांना कार्यकर्त्यांना तहसीलबाहेर काढावे लागले. यावेळी अर्ज भरण्याकरिता महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. (crowd for gram panchayat election nomination in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर

(crowd for gram panchayat election nomination in maharashtra)