पुण्यातील (Pune) लाल महालमध्ये (Lal Mahal) लावणी नृत्याचा व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी राज्यभरात त्यावर निषेध व्यक्त होतोय. ऐतिहासिक लाल महालात डान्स करणाऱ्या डान्सर वैष्णवी पाटीलसह (Vaishnavi Patil) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवीने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर लावणीचा व्हिडीओ लाल महालात शूट केला होता. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. वैष्णवीच्या या कृत्यावर सोशल मीडियावरून टीका झाली. तर संभाजी ब्रिगेडसग पुरोगामी संघटनांनी या घटनेविषयी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता याप्रकरणी वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. “अनवधानाने माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा”, असं ती या व्हिडीओत म्हणाली आहे.
“काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील लाल महालात चंद्रा लावणी या डान्सचा व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करत असताना माझ्या ध्यानीमनीसुद्धा आलं नव्हतं की असं काही होईल. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ केला. शिवप्रेमींचं आणि तुम्हा सर्वांचं मन दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. मी स्वत: शिवप्रेमी आहे. माझ्याकडून चूक झाली हे मला कळलं आणि ज्याक्षणी मला ते कळलं त्याक्षणी मी तो व्हिडीओ डिलिट केला होता. परंतु तो डिलिट करण्याआधीच तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि खूप ठिकाणी शेअर झाला. आताही मी चाहत्यांना विनंती करतेय की तो व्हिडीओ डिलिट करा. मी लाल महालात व्हिडीओ करण्याची चूक केली. मी जाणूनबुजून ती चूक केली नव्हती. मी माझी चूक मान्य करते. मी सर्वांची माफी मागते. एक मराठी मुलगी आणि शिवकन्या असल्याचा मला अभिमान आहे. मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही असं वचन देते. फेमस होण्यासाठी हा व्हिडीओ केला असा आरोप अनेकांनी केला. पण असं काहीच नाही”, असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.
वैष्णवीसोबत या व्हिडीओत कोरिओग्राफर आणि डान्सर केदार अवसरे यानेसुद्धा जाहीर माफी मागितली. “अर्धवट ज्ञानातून आणि बालबुद्धीने आमच्याकडून ही चूक झाली. यातून कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. मोठ्या मनाने आमची चूक पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा”, असं तो म्हणाला.
दरम्यान लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे. ज्याठिकाणी गाण्याचे शूटिंग झाले, त्या संपूर्ण परिसराचे शुद्धीकरण अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आले आहे. माँ जिजाऊंच्या पुतळ्याला यावेळी दुग्धाभिषेक घालून अन् शूट झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं.