पुणे : राज्यातील शहरांचे नामांतर होत आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला. त्याचवेळी नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. मग ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्याची घोषणा झाली. राज्यातील शहरांचे नामांतर होत असताना पुणे शहरातील प्रसिद्ध पोलीस ठाण्याचे नामांतर करण्यात आले. पुण्यातील ऐतिहासिक पार्वती टेकडीजवळ असलेल्या दत्तवाडी पोलीस ठाण्याला आता नवे नाव मिळाले आहे.
पुण्यातील ऐतिहासिक पार्वती टेकडीजवळ असलेल्या दत्तवाडी पोलीस ठाणे आहे. डिसेंबर २००७ रोजी स्वारगेट पोलिस ठाण्याचे विभाजन करून दत्तवाडी पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली. परंतु या पोलीस ठाण्याचे नाव बदलण्यात आले आहे. या दत्तवाडी पोलीस ठाणे पर्वती पोलीस ठाणे झाले आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या गृहविभागाने काढला आहे.
सध्याची दत्तवाडी पोलीस चौकी दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. आता पोलीस चौकी आणि पोलीस ठाणे या दोन्ही ठिकाणी एकच नाव असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पोलीस अधिकाऱ्यांना दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलून पर्वती पोलीस ठाणे करण्याची विनंती केली. याबाबतचा प्रस्ताव शहर पोलिसांनी शासनाकडे सादर केला होता.
पुणे पोलिसांच्या या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने मान्यता दिली. यासंदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला. त्यानंतर पोलीस ठाण्याचा फलकही बदलण्यात आला. नवीन नावाच्या अधिसूचनेसोबतच या पोलीस ठाण्याचे नाव कागदोपत्री दुरुस्त करण्यात येत आहे.
संभाजी ब्रिगेडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र हिंदू महासंघानं त्याला विरोध केलाय. संभाजी ब्रिगेडनं पुण्याचं नाव जिजापूर किंवा जिजाऊनगर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता अमोल मिटकरींनी पुण्याला जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र पुण्याचं नाव पुणेच राहावं, अशी भूमिका हिंदू महासभेनं घेतलीय. सत्ताधारी असोत की मग विरोधक, नामांतरांच्या मुद्द्यााला निवडणुकांच्या तोंडावरच फोडणी दिली जाते. याआधी औरंगाबादचं, उस्मानाबाद नामांतर झाले. आता अहमदनगरच्या नामांतराची घोषणा झाली. आता पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी पुढे आलीय.