पुणे | 11 जानेवारी 2024 : डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी विद्यार्थ्यांनी अडवली. शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी देखील या परिक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यावेळी विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. विद्यार्थ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं.
पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसांपासून डीएड आणि बीएडचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. शिक्षण भरतीमध्ये इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. हीच मागणी घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील त्या परिसरात आले असता त्यांची गाडी अडवली. आंदोलक कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला घेराव घातला. विद्यार्थ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करावं कारण त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय, अशी भूमिका या विद्यार्थ्यांची आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी हा अन्याय आहे, असंदेखील या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी गाडीला घेराव घातला तेव्हा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साध्यण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण बघायला मिळालं होतं. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी पुढे सोडण्यात आली.
डीएड आणि बीएडचं शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना आज नोकरी मिळणं खरंच खूप अवघड आहे. अनेक विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. काही विद्यार्थी खूप तुटपुंज्या पगारात काम करत असतात. तर काही विद्यार्थी आपण पर्मनंट होऊ या आशेने वर्षोनुवर्षे एखाद्या शिक्षण संस्थेत कार्यरत असतात. अशा तरुणांचा नोकरीचा प्रश्न सोडवणं हे फार गरजेचं आहे.