राजनाथ सिंह म्हणाले, शिवाजीराजांना खेळाचं शिक्षण दादोजी कोंडदेव-रामदासांनी दिलं; संभाजी ब्रिगेड-कोल्हेंकडून माफीची मागणी

| Updated on: Aug 28, 2021 | 2:11 PM

छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद पेटला आहे.

राजनाथ सिंह म्हणाले, शिवाजीराजांना खेळाचं शिक्षण दादोजी कोंडदेव-रामदासांनी दिलं; संभाजी ब्रिगेड-कोल्हेंकडून माफीची मागणी
खासदार डॉ. अमोल कोल्हे, राजनाथ सिंह आणि संतोष शिंदे
Follow us on

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पुण्यात केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याचा निषेध करत राजनाथ सिंहांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

राजनाथ सिंह नेमकं काय म्हणाले, कोणत्या वक्तव्यावरुन नेमका वाद?

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात नीरज चोप्रा याच्या नावाने स्टेडियमचं उद्घाटन पार पाडलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य पुण्यामध्ये देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे.

राजनाथ सिंहांनी चुकीचा इतिहास सांगून अज्ञान दाखवलं, संभाजी ब्रिगेड आक्रमक

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत रामदासाची कधीही भेट झालेली नाही. समकालीन इतिहासामध्ये सुद्धा तसा कुठलाही पुरावा नाही, हे हायकोर्टाने सुद्धा मान्य केले आहे. मात्र जाणीवपूर्वक खोडसाळपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व नाकारण्यासाठी गुरु म्हणून रामदास व दादोजी कोंडदेव हे सांगितले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकर्तुत्वावर इतिहास घडवला. आरएसएसच्या तथाकथित इतिहासकारांनी आजपर्यंत खोटे आणि वादग्रस्त इतिहासाचे लेखन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही फार मोठी गॅंग आहे”

“राजनाथ सिंग यांनी सुद्धा खोटा, चुकीचा इतिहास लष्कराच्या कार्यक्रमांमध्ये सांगून अज्ञानाचे दर्शन दिले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अज्ञान आहे. खोटा इतिहास सांगणाऱ्यांनी शिवरायांच्या इतिहासाची गद्दारी करू नये”, अशी आक्रमक भूमिका संभाजी ब्रिग्रेडने मांडली आहे.

राजनाथ सिंहांनी महाराष्ट्राची, शिवप्रेमींची माफी मागावी

छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाचे शिक्षण दिले असे आजपर्यंत कोणीही लिहिले किंवा सांगितले नाही. हा खोटारडेपणा वेळेत थांबवा. राजनाथ सिंग यांनी हा खोटा इतिहास महाराष्ट्रामध्ये सांगुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रकार केलेला आहे. खोटा इतिहास आम्ही कधीही मान्य करणार नाही. म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तमाम शिवप्रेमींची तात्काळ माफी मागावी अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे.

अमोल कोल्हेंकडून राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानाचा केवळ निषेध करून भागणार नाही. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे, अशी शक्यता अमोल कोल्हे यांनी वर्तवली.

आपला इतिहास देशभरात व जगभरातही पोहोचायला हवा- कोल्हे

खरा आणि नि:पक्षपाती तर्कसंगत इतिहास महाराष्ट्राबाहेर देशभरात व जगभरातही पोहोचायला हवा. कुणी एक हिंदी दिग्दर्शकसुद्धा मुघलशासक हे राष्ट्रनिर्माते होते अशी मांडणी करु पाहतो तेव्हा याचा आणखी गांभीर्याने विचार व्हायला हवा, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

जे आहे ते उजळ माथ्याने मांडायला हवे , ज्याचे जे आणि जेवढे योगदान आहे तेच समोर यायलाही हवे परंतु अकारण स्तोम माजवून माथी मारण्याचे प्रकार थांबवायला हवेत. आणि ही प्रबोधनाची वैचारिक लढाई त्याच माध्यमातून लढायला हवी. केलेला निषेध अथवा आंदोलन क्षणिक ठरू शकते परंतु साहित्य, कलाकृती यांचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो याचा विचार व्हायला हवा, असंही कोल्हे म्हणाले.

(Defence Minister Rajnath Singh Controvercial Statement on Chhatrapati Shivaji Maharaj over Sambhaji Brigade mp Amol kolhe Aggessive)

हे ही वाचा :

VIDEO : मी न घाबरणारा मराठा आहे, उज्ज्वल निकम यांचं बेधडक भाषण