लोणावळा, पुणे : लोणवळ्यातील (Lonavala) घनदाट जंगलात हरवलेल्या तरुणाचा अखेर मतदेह सापडला आहे. त्याच्या शोधासाठी NDRFची टीम पोहोचली होती. त्यापूर्वी INS शिवाजीच्या टीमला दरीमधून मृतदेह कुजलेला वास आला. त्याठिकाणी NDRFची दाखल होत तपासणी केली असता एक मृतदेह (Deadbody) आढळून आला. हा मृतदेह फरहान शहाचा असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तीनशे ते चारशे फूट दरीत पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यामध्ये ड्यूक्स नोज पॉइंट (Duke’s Nose Point) येथे सहलीला गेलेला दिल्लीमधील पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलात बेपत्ता झाला होता. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात हरवलो असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही तासांनी त्याचा फोन बंद झाला. त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने तो हरवल्याची तक्रार दाखल केली.
20 मे रोजी खंडाळ्यातील दाट जंगलात बेपत्ता झालेल्या युवकाच्या शोधार्थ पुणे ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव सरंक्षक आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक हे सर्व या युवकाचा दाट जंगलात शोध घेत होते. तो बेपत्ता होण्यापूर्वी अंगात लाल टी-शर्ट आणि काळी पॅन्ट असल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे फरहान शहा याच्या परिवाराने एक पत्रक प्रसिद्धीसाठी काढले होते. ज्यात मजकूर दिला होता, की जो कोणी बेपत्ता फरहान शहा यास शोधून काढेल, त्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृतदेह सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
फरहान शहा कोल्हापूर, पुणे येथे एक दिवस थांबला आणि नंतर लोणावळ्यातील ड्यूक पॉइट येथे फिरायला गेला. गिर्यारोहण ही त्याची आवड होती. मात्र तो रस्ता चुकला. त्याच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या भावाला फोन करून तशी माहिती दिली. तेव्हा तो एकटाच होता आणि जंगलात त्याचा ट्रॅक हरवला होता. त्याच्या भावाने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. दरम्यान, यापूर्वीही ड्यूक पॉइंट स्पॉटवरून लोक बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.