पुणे : पुणे, मुंबईवरुन विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातून अनेक ठिकाणी नवीन विमानसेवा सुरु केली जात आहे. जून महिन्यात 11 नवीन विमान सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच रिक्त असलेल्या स्लॉटमध्ये जुलै महिन्यात लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. त्याचवेळी दिल्लीवरुन पुणे येण्यासाठी विमानाच्या तिकीट शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. गो फर्स्टचे परिचालन निलंबित केल्यानंतर हा बदल झाला आहे. देशातील मुख्य दहा मार्गांवरील हवाई तिकिटांचे दर ६ जूनच्या तुलनेत २९ जून रोजी ७४ टक्के कमी झाले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान वाहतूक मंत्रालयाने हवाई मार्गावरील दर कपात करण्याचे निर्देश दिले होते.
दिल्ली ते पुणे मार्गावर तिकीट दरात ७० टक्के कपात झाली आहे. दिल्ली अहमदाबाद मार्गावर ७२ टक्के तर दिल्ली-श्रीनगर मार्गावर ३६ टक्के हवाई भाडे कमी झाले आहे. त्याचवेळी काही मार्गांवरील तिकिटांचे दर वाढले आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावरील दर २३ टक्के वधारले आहे तर पुणे दिल्ली मार्गावरील दरात १७ टक्के वाढ झाली आहे.
विमान प्रवासाचे दर कमी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून देण्यात आले होते. विमान प्रवाशाचे दर वाढल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच भारतात विमान कंपन्यांना दर ठरवण्याचे अधिकार आहे. त्यावर नियंत्रण नाही. यामुळे सर्वच विमान कंपन्यांनी दर वाढवले होते. ते कमी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश दिले, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती.
भारतात विमान तिकिटांच्या दरासंदर्भात काहीच नियम नाही. मागणी वाढल्यास दर वाढतात, असे समीकरण आहे. यामुळे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दर कपात करण्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेक मार्गावरील दर कमी झाले.