योगेश बोरसे, पुणे, दि.15 जानेवारी 2024 | देशात यंदा कमी झालेल्या पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामावर परिणाम झाला आहे. यामुळे यंदा रब्बी हंगामाची लागवड कमी झाली आहे. आता मागणी वाढल्यामुळे मकर संक्रांतीमुळे भाज्यांचे भाव कडाडले आहे. पुणे शहरात भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्यांना मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे दर ३० ते ४० रुपयांपर्यंत गेला आहे. वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर, कांदापात, वांगी आदी भाज्यांना मागणी संक्रातीमुळे वाढली आहे. यामुळे सामान्यांना अधिक दर देऊन भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. यामुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात 25 प्रकारच्या फळभाज्या, तिळगुळ आणि विविध फुलांचा वापर करत अनोखी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी केली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा , सोळखांबी ,चारखांबी अशा मंदिराच्या विविध भागांना गाजर, मुळा, फ्लोवर, कोबी, टोमेटो, मेथी, पालक, शेपू, तांदूळसा, भेंडी, गवार, कारले, वांगे, बटाटा, बिट सोबत अगदी सराटी, घोळ, चिघळ, कुर्डू, केळफूल, कडवंची, हदगाचिंचेचा चिगोरफूल, चंद्र नवखा, देवडांगरं अशा 25 प्रकारच्या भाज्या एकत्रित करून सजवले आहे. तसेच काही ठिकाणी तिळगूळ वापरून ही सजावट अधिकच सुंदर केली आहे. या सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.