‘लोकांच्या भावना भडकतील अशा….’, निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 09, 2024 | 9:20 PM

पत्रकार निखिल वागळे यांच्यावर गाडीवर आज भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. याचवेळी त्यांनी निखिल वागळे यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं.

लोकांच्या भावना भडकतील अशा...., निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Follow us on

पुणे | 9 फेब्रुवारी 2024 : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याकडून आज ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं. पण ते कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेवर आता पुणे पोलिसांची तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील प्रतिक्रिया समोर आली आहे. निखिल वागळे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आधीच त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. फडणीसांनी या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

“कायदा आणि सुव्यवस्था कुणीही हातामध्ये घेऊ नये. मग ते कुणीही असो, भाजपचं असो किंवा इतर कुणीही असो, आम्ही त्याच्यावर कारवाई करुच. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्ये करणं देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. तथापि हे कितीही चुकीचं बोलले तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे. ते पोलीस चोखपणे करतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पोलिसांनी प्रतिक्रिया काय दिली?

या घटनेवर पुणे पोलिसांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. “आज इकडे कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी आज इथे पोलीस बंदोबस्त लावलेला होता. सहा वाजेपासून कार्यक्रम सुरु देखील झाला होता. निखिल वागळे इथे येणार होते. त्यांच्याशी आम्ही बातचित केली होती. पण इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे येत होते. ट्राफीकमधून येत असताना त्यांच्या गाडीच्या मागेपुढे पोलीस होते. पण येत असताना काही जणांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकली आणि पाठीमागून दगड फेकले आहेत. त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करु आणि सगळ्यांवर कारवाई करु”, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

“चार वाजेपासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त दिला होता. ते येत असताना मध्य ट्राफीकमध्ये कुणीतरी संधी साधून दगड टाकली आहे. संबंधितांवर कारवाई होईल, अशी प्रतिकक्रिया पोलिसांनी दिली. “निखिल वागळे यांच्या येण्याच्या वेळेत थोडा मागेपुढे झाला”, असंही पोलिसांनी सांगितलं.