अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 6 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या सहा कार्यालयावर काल ईडीने छापेमारी केली. सात ते आठ तास ही छापेमारी सुरू होती. रोहित पवार हे परदेशात असतानाच ही छापेमारी झाली. या छापेमारीवर रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. परदेशातून येताच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही ज्या लोकांवर आरोप केले, ज्यांचे घोटाळे बाहेर काढले. ते लोक भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या घोटाळ्याचं काय झालं? आमच्या कंपन्यांवर ईडीची धाड पडली. अशा धाडींमुळे मी घाबरणार नाही, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस हे पुणे शहरात असताना दिवसाढवळ्या गँगवार होतो. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
मी चुकीचं केलं असतं तर मी काल संध्याकाळी परदेशातून आलो नसतो. अजून 10 ते 15 दिवस बाहेर राहिलो असतो. या आधी ज्यांच्या ज्यांच्यावर कारवाई झाली ते एक तर दिल्लीला गेले. किंवा सत्ता बदल झाल्याचं तरी आपण पाहिलं आहे. मी अजिबाबत घाबरलो नाही. मी सिंपथीही घेत नाही. लोकांना कारवाई का केली? कशी केली माहीत आहे. अधिकाऱ्यांचं काहीही चुकलं नाही. त्यांना जे सांगितलं जातं तेच ते करतात. ते येतात, कागदपत्रं तपासतात आणि जातात, असं रोहित पवार म्हणाले.
ज्या गोष्टी मला माहीत नाही, त्याची मला मीडियातून माहिती मिळते. कागदपत्र जप्त झाल्याची बातमी मीडियातूनच कळली. गुप्त कागदपत्र हा ईडी आणि आमच्यातील विषय होता तो मीडियाला कसा कळला? याचं आश्चर्य आहे. आम्ही तर ती कागदपत्रं पाठवली नव्हती. यावरून समजून घ्या. काही लोकांना यात राजकारण करायचं आहे. उलट आम्हाला तर राजकारण करायचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
फडणवीस यांना एवढंच सांगायचं आहे. तुम्ही ज्या शहरात ज्या दिवशी असता त्या दिवशी उघड उघड दिवसाढवळ्या लोकांचे खून होत आहे. आज सर्वात खराब पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्रात आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांच्यावर कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद बाजूला ठेवावं आणि फक्त गृहमंत्रीपद पाहावं आणि तिथे तरी न्याय द्यावा. म्हणजे गरिबांना न्याय मिळेल. जर होम मिनिस्टर म्हणून त्यांना न्याय देता येत नसेल तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा. ते काय करतात त्यावर त्यांनी जास्त बोलावं. दुसऱ्यांच्या गोष्टींवर जास्त बोलू नये असं मला वाटतं, अशी टीकाही त्यांनी केली.
माझा आक्षेप ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही. ते काम करत असतात आम्ही त्यांना सहकार्य करत असतो. आम्ही सर्व कागदपत्र दिले. भाजपचं सरकार आलं, तेव्हा सर्वच कारवाया आमच्यावर झाल्या. जे कागदपत्र लागतात ते सर्व आम्ही त्यांना दिले. माझा विषय मोठा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मला एवढंच सांगायचं, तुमच्याकडे येण्यापूर्वी तुम्ही ज्या नेत्यांवर आरोप केले, ज्यांच्यावर कारवाई सुरू होती, त्याचं काय झालं? मी बिझनेसमध्ये आधी होतो, नंतर राजकारणात आलो. जे लोकं आधी राजकारणात आले, नंतर मोठे बिझनेसमेन झाले, त्याचे काय करणार आहात? एक व्यक्ती ट्विट करतो आणि आरोप करतो. त्याच्या आधीच्या आरोपाचं काय झालं? तो हातोडा घेऊन निघायचा. त्याचं काय झालं?, असा सवाल त्यांनी केला.