“क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो आपल्याला वारसा दिला, तो पुढे नेणारा आजचा कार्यक्रम आहे. भिडे वाड्यात मुलीची पहिली शाळा सुरु झाली. अनेक लोक त्या काळात दुस्वास करायचे. विरोध करत होते. शेणाचे गोळे, दगड धोंडे फेकायचे. पण सावित्रीबाई फुले मागे हटल्या नाहीत. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्यामागे उभे होते. शाळा सुरु झाली. त्या एका शाळेने मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. हा शिक्षणाचा, समाज सुधारणेचा वारसा आपल्याला मिळाला आहे. त्या वारशाची आठवण करुन देणारं स्मारक भिडे वाड्यात करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“भुजबळ साहेबांनी इतिहास सांगितला. कशाप्रकारे वर्षानुवर्ष भिडे वाडा मिळाला पाहिजे म्हणून लढाई सुरु होती. अतिशय कमी कालावधीत सुंदर प्रकारच स्मारक पुढची 100, 200, 500 वर्ष प्रेरणा देत राहिल ते सुरु होतय. म्हणून मनापासून अभिनंदन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पुणे समाजसुधारकांची भूमी आहे. आज वारशाचा जसा कार्यक्रम आहे, तसा विकासाचा सुद्धा आहे” असं फडणवीस म्हणाले.
पुणे मेट्रोबद्दल काय बोलले?
पुणे मेट्रो प्रकल्पाची माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. “पुणे मेट्रोच उद्घाटन पुढे गेलं, म्हणून काही लोक छाती बडवत होते. ज्यांनी कधी एक पिलर उभारला नाही, ते छाती बडवण्यात पुढे होते. काहीतरी करुन दाखवा, मग छात्या बडवा” अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. “2014 साली युती सरकार आल्यानंतर पुणे मेट्रोल गती मिळाली. पुणे मेट्रोची काम वेगात पूर्ण झाली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा हा देशात वेगाने पूर्ण होणारा पहिला टप्पा आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.