सुनिल थिगळे, आंबेगाव, पुणे, संभाजी मुंडे, परळी, बीड | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. या ठिकाणी मतमोजणी सुरु झाली आहे. त्यात अनेक प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या गावात धक्का बसला आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. त्याचवेळी परळीमध्ये पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी जोर का झटका दिला. यापूर्वी तालुक्यातील तीन ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांच्या ताब्यात होत्या. त्यापैकी दोन ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांना मिळाल्या. पंकजा मुंडे यांना केवळ एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला.
राज्याचे सहकारमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्याच गावात धक्का दिला आहे. निरगुडसर गावात झालेल्या चुरशीच्या झालेल्या लढतीत शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. सरपंचपदासाठी शिंदे गटाचे रवी वळसे 135 मतांनी विजयी झाले आहे. पुणे जिल्हयात अनेक ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी होत आहे. परंतु आंबेगावात त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला. निरगुडसर गावात शिंदे गटाचे सरपंच रवी वळसे पाटील विजयी झाले. या ठिकाणी एकूण 13 पैकीं 3 सदस्य शिंदे गटाचे तर 10 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले. रवी वळसे यांना 1483 तर राष्ट्रवादीचे संतोष टाव्हारे यांना 1348 मते मिळाली.
परळी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी धनंजय मुंडे यांनी दोन ग्रामपंचायतीवर यश मिळवले. तसेच पंकजा मुंडे यांना एका ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळवता आले. यापूर्वी या तिन्ही ग्रामपंचायती पंकजा मुंडे यांच्या ताब्यात वैजनाथ तालुक्यातील हिवरा, सोनहिवरा आणि वाणटाकळी तांडा या ग्रामपंचायतीवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व होते. परंतु आता त्यांच्यकजे एक ग्रामपंचायत राहिली आहे.
परळी तालुक्यातील मतमोजणीसाठी एकूण 9 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण 26 जागासांठी मतमोजणी झाली. आजच्या निकालातून हिवरा व वाणटाकळी तांडा या दोन ग्रामपंचायती धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. उर्वरित सोनहिवरा या एका ग्रामपंचायतीत वर्चस्व कायम राखण्यात पंकजा मुंडे यांना यश मिळाले आहे.