पुणे | 21 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले. अजित पवार यांनी आपली वेगळी वाट स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील आले. राष्ट्रवादीतील दोन्ही गट आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरळ सरळ शरद पवार यांना घेरले. त्यांनी शरद पवार यांच्यासारखे नेते असतानाही राष्ट्रवादीला एकहाती सत्ता आणता आली नाही, असे वक्तव्य केले. त्यानंतर शरद पवार यांचा गट आक्रमक झाला. आता दिलीप वळसे पाटील यांनी यु टर्न घेतला आहे.
एकीकडे ममता बॅनर्जी, मायावती या मुख्यमंत्री झाल्यात. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सरकारे आलीत. आपले नेते उतुंग नेते आहेत. परंतु आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 60 ते 70 आमदार निवडून येतात. यामुळे आम्हाला आघाडी करुन सरकार स्थापन करावे लागते. एकट्याच्या ताकतीवर आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यामधील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला एकदाही बहुमत दिले नाही, असे वक्तव्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले होते.
दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे याविषयावर स्पष्टीकरण करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, माझ्या वाक्याचा माध्यमांनी चुकीच्या अर्थ लावत विपर्यास केला आहे. माझे संपूर्ण भाषण ऐकलं तर पवारांबद्दल मी असे बोललो नाही. गेली ४०-५० वर्ष शरद पवार यांनी देश आणि राज्यातील जनतेसाठी काम केली आहेत. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. स्वत:च्या हिंमतीवर सत्तेवर बसतात.
पण महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही. याची मला खंत आहे. ती खंत व्यक्त करत होतो. त्यात पवार यांना कमी लेखण्याचा किंवा त्यांच्याबद्दल चुकीच बोलण्याचे मला अधिकार नाही. मी या विषयाला जास्त महत्त्व देत नाही. आंबेगावमधील जनता काय करते ते निवडणुकीत पाहू. पवार आमचे नेते आहेत. ते भविष्यातही राहतील.
दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वबळावर मुख्यमंत्री झाला नसेल, तर त्याला तुम्हीसुद्धा जबाबदार आहात, असे रोहित पवार यांनी म्हटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या सर्व वादांमुळे दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेचे खापर माध्यमांवर फोडले आहे.