पुणे | 21 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलेल्या राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच शरद पवार यांच्या राजकारणाची चिरफाड केली. आपण शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा नेताही देशात नाही म्हणतो. पण मायावती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होतात. त्यांच्या राज्यात एकहाती सत्ता आणतात. पण शरद पवार उत्तुंग नेते असूनही त्यांना राज्यात एकहाती सत्ता आणता आली नाही, असा थेट हल्लाच दिलीप वळसे पाटील यांनी चढवला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दिलीप वळसे पाटील मंचर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांना एकट्याच्या ताकतीवर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिले नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
एकीकडे ममता बॅनर्जी, मायावती या मुख्यमंत्री होतात. अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. आणि आपले नेते उतुंग नेते असताना आमचे 60 ते 70 आमदार निवडून येतात आणि कोणासोबत तरी आघाडी करावी लागते. त्यामुळेच आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा दिलीप वळसे पाटील यांनी केला.
आपण अजूनही भाजप सोबत गेलेलो नाही तर आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँगेस हाच आहे. आपण अजूनही राष्ट्रवादी काँगेस पक्षामध्येच आहोत. चिन्ह कोणाला मिळेल, नाव कोणाला मिळेल याबाबत निवडणूक आयोग निर्णय देईल. मात्र त्यांचा निर्णय आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक पंचायत होऊ शकते, असं सूचक विधानही वळसेपाटील यांनी केलं.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वळसे पाटील यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. मला आश्चर्य वाटतंय. तुम्हीही शरद पवार यांच्या आसपासचे नेते होता, तुम्ही का नाही जबाबदारी पार पाडली असं लोक म्हणतील तेव्हा वळसे पाटील यांच्याकडे काय उत्तर असेल असा सवाल रोहित पवार यांनी केला.
ज्यांना पवार साहेबांनी उभं केलं. आता अशा काळात पवार साहेबांच्या सोबत तीच लोकं नसतील आणि पवार साहेबांचे ज्यांनी विचारही सोडले आहेत त्यांना पवारांवर बोलण्याचा अधिकार काय आहे? जर राष्ट्रवादीचा स्वबळावर मुख्यमंत्री बनला नसेल, तर त्याला काही अंशी ते सुद्धा जवाबदार आहेत असं मला वाटतं, असं रोहित पवार म्हणाले.