उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत एक अतिशय अनपेक्षित अशी बातमी समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. वळसे पाटील रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात असताना पाय घसरुन पडले. त्यांना या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप वळसे पाटील पाय घसरुन पडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पण या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वळसे पाटील यांना तसा कोणताही धोका नाहीय. ते लवकरच बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. उपचाराला इतके दिवल लागतील हे पाहता त्यांना दुखापत गंभीर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पण ते लवकर बरे होतील, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल”, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
दिलीप वळसे पाटील हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री देखील होते. तसेच त्यांची पुणे जिल्ह्यात चांगली ताकद आहेत. ते आंबेगावात तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षात चिंतेचं वातावरण आहे. त्यांच्या समर्थकांकडून वळसे पाटील लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली जात आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्यावर शिरुर लोकसभा मतदारसंघा सध्याच्या घडीला पक्षाची मोठी जबाबदारी आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील अशी थेट लढत होत आहे. ही लढत दोन्ही गटांसाठी करो या मरोच्या धर्तीवर आहे. या मोठ्या लढतीत आढळराव पाटील यांच्या प्रचाराची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्यावर अजित पवारांकडून सोपवण्यात आली आहे. असं असताना वळसे पाटील यांना दुखापत झाली आहे.