सागर सुरवसे, सोलापूर दि.25 डिसेंबर | शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षातील दोन आमदारांमधील वाद समोर आला आहे. या दोन आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसत आहे. सोलापूर हे खेडे आहे या वक्तव्यावरून भाजपच्या दोन आमदारात शाब्दिक टोलेबाजी झाली आहे. या प्रकाराची चर्चा सोलापूर जिल्ह्यातच नव्हे राज्यात सुरु झाली आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यात वाक् युद्ध रंगल्याचे सध्या सोलापूरमध्ये पाहायला मिळात आहे. दोन आमदारांमधील वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
सोलापूर हे मोठे खेडं आहे. त्याचा आणखी विकास करून कसे मोठे करता येईल. सोलापूरचे नावलौकिक कसा वाढवता येईल, त्याचा विचार केला गेला पाहिजे, असे विधान आमदार सुभाष देशमुख यांनी केले. मात्र यातील सुभाष देशमुख यांच्या ‘खेडं’ या शब्दाला भाजपचे दुसरे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. विजयकुमार देशमुख म्हणाले की, सुभाष बापू खेडे का म्हणाले मला कळले नाही. सोलापूर जिल्ह्यात सोन्याचा धूर निघत होता. सोलापूरमध्ये चादरीचे कारखाने प्रसिद्ध होते. बापू दोन वेळा खासदार होते, आता आमदार आहेत. सोलापूरचा विकास करणे आमचे सर्वांचे काम आहे. आम्ही त्यासाठी कटीबद्ध आहोत. सोलापूर दक्षिणेसाठी प्रवेशद्वार म्हटले जाते. देशाच्या प्रत्येक भागाला सोलापूर जोडले गेले आहे. सोलापुरात जमीन स्वस्त आणि मुबलक मॅन पॉवर आहे.
दरम्यान भाजपच्या दोन आमदारांमध्ये झालेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते महेश कोठे यांनी समर्थन केले आहे. सोलापूर हे खेड आहे या आमदार सुभाष देशमुखांच्या म्हणण्यात तथ्य आहे. कारण येथील शिकलेला मुलगा आज बाहेर चालला आहे. तो बाहेर गेला की दोन वर्षात घर घेतो मात्र सोलूपरमध्ये राहणारा व्यक्ती 20 वर्षे घर घेऊ शकत नाही. सत्तेतल्या आमदारांच्या विधानामुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला.