पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज अन् ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात दाखल झाल्या. ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी पालखांचे स्वागत करण्यात आले. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिरात आहे तर संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात नाना पेठ येथे असणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी मंदिरांमध्ये पालखीचे आगमन झाल्यावर अभिषेक, पादुका पूजन आणि आरतीने पालख्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रात्रभर भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान आज दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी पालखीतील अश्व नतमस्तक झाले.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक झाले. हा अश्व मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत गणराया चरणी नतमस्तक होताच गणपती बाप्पा मोरया… माऊली माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याच देही याच डोळी…हा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
कर्नाटक बेळगावमधून हे अश्व आली आहे. अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे अश्व आहेत. हिरा-मोती अशी त्यांची नावे आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात हे अश्व आल्यावर त्यांचे पूजन करण्यात आले. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त अन् कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन केले. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करुन हे अश्व वारीला जातात.
काही वर्षांपूर्वी मंदिराबाहेरुन अश्व गणरायाचे दर्शन घेत होते. मात्र, आता अश्वांनी गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना दिली आहे. ही शुभ गोष्ट आहे. दगडूशेठ मंदिरातील श्रीगणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व ळंदीकडे प्रस्थान करतील. ज्या भाविकांना वारीला जाता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतील.