पुणे: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला आहे. एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळालं नाही म्हणून चिंता करू नका. एमपीएससी नाही झाला तर आमदार आणि खासदार होता येतं, असा अजब सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. पडळकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर आमदार आणि खासदाराने कधी आत्महत्या केल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असा सवालच या विद्यार्थ्यांना पडळकर यांनी केला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी हा अजब सल्ला दिला. तुम्ही एमपीएससी नाही झाला तर गावाकडं सरपंचाची पोस्ट तुमची वाट पाहत आहे. एमपीएससी नाही झाला तर पंचायत समितीच्या सदस्यपदाची जागा वाट पाहत आहे. तुम्हाला सभापती होता येईल, असा सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
एमपीएससी नाही झाला तर चिंता करू नका, झेडपी मेंबर होता येईल. एमपीएससी नाही झाला तर आमदार, खासदार होता येईल. इथे स्पर्धा मोठी आहे. जो तो म्हणतो एमपीएससीत स्पर्धा मोठी आहे. पण तसं नाही. इथे 12 कोटीतून 288 आमदार विधानसभेत आहेत. ही किती मोठी स्पर्धा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीत पडला म्हणून माजी आमदाराने आत्महत्या केली असं कधी तुम्ही ऐकलंय? ऐकलं का तुम्ही? मंत्रीपदाच्या यादीत नाव आलं नाही म्हणून या या आमदाराने आत्महत्या केली असं ऐकलं का? मग त्यांना काय निराशा आली नसेल तर? असा सवालही त्यांनी केला.
दरम्यान, पडळकर यांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पडळकर यांना डोक्याचा भाग नसल्याची टीका केली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी सारवासारव केली आहे.
मी वयाच्या 22 व्या वर्षापासून कार्यकर्ता म्हणून फिरतो आहे. विद्या ताईंनी माहिती घ्यायला हवी. एमपीएससी बाबत आज चर्चा झाली. पाच आमदार आज या संवादात सामील होते. एमपीएससीला खूप स्पर्धा आहे म्हणून तुम्ही नैराश्यात जाऊ नका हे सांगण्यासाठी मी ते विधान केलं, असं पडळकर यांनी सांगितलं.
एमपीएससीचा विद्यार्थी गावाकडे येऊन सभापती झाला तर वाईट काय आहे? सोमवारी एमपीएससी बाबत एक बैठक घेणार आहोत. एमपीएससी सदस्य निवडीसाठी ओपन, एससी, एसटी, भटक्या विमुक्त जातींना प्राधान्य द्यावं अशी आमची मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार जातीपातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत हे काय नव्याने लोकांच्या समोर येत नाहीये. हा अनेक वर्षांपासूनचा विषय आहे.
जातीपातीच्या लोकांचा मतासाठी वापर करायचा, आपलयाला पाहिजे तेवढं घ्यायचे, त्यांना तोंडी लावायला काहीतरी द्यायचं, मनमानी आणि नात्यागोत्याचं राजकारण करायचं आणि प्रस्थापित लोकांना मोठं करायचं हेच पवारांनी केलं, असं सांगतानाच राज ठाकरे यांचे मत हेच माझे मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.