अभिजित पोते, पुणे, दि. 20 फेब्रुवारी 2024 | पुणे सांस्कृतिक शहर म्हणून जगभर ओळखले जाते. परंतु आता पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. ड्रग्सची तस्करी होत आहे. खुलेआम ड्रग्सची विक्री होत असते. एखादा कैदी रुग्णालयातून ड्रग्सचे रॅकेट चालवण्याचा प्रकार उघड झाला होता. कैदी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून ड्रग्सचे रॅकेट चालवत होता. या प्रकरणात MD ड्रग्सची तस्करी उघड झाली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालयातून पोलिसांना तुरी देऊन ललित पाटील फरार झाला. ड्रग्सचे हे प्रकरण अजून शांत झाले नसताना पुणे शहरातून ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय प्रकरण समोर आले आहे.
पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. 19 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले. 52 किलो पेक्षा जास्त मेफेड्रॉन (Md) ड्रग्स मिळाले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख या तिघांना अटक केली होती. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. यामधील वैभन माने आणि हैदर शेख यांच्यावर अनेक गुन्हा दाखल आहे. ते वर्षभरापूर्वी येरवडा कारागृहात होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर या दोघांनी ड्रग्सची विक्री करण्यास सुरुवात केली.
पुणे शहरात ड्रग्स विक्री करण्यासाठी आरोपींनी शक्कल लढवली. ड्रग्ससाठा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून हैदर शेख याने मिठाच्या पाकिटात विश्रांतवाडी परिसरात ड्रग्स लपावले होते. या ड्रग्सची मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे विक्री केली जाणार होती. हे दोन्ही परदेशी नागरिक आहेत. पुण्यात पकडलेले एमडी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार होते. माने आणि हैदर यांच्यावर यापूर्वी अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
पुणे शहरात यापूर्वी ड्रग्स तस्कर ललित पाटील त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर आरोपींना अटक झाली होती. या लोकांना ड्रग्सचा कारखानाच उघडला होता. साकीनाका पोलिसांनी ३०० कोटींचे ड्रग्स जप्त केल्यानंतर त्याची चर्चा राज्यभर झाली. आता पुन्हा पुणे शहरातील प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे.