थकबाकीदारांचा वीज पुरवठा तोडण्याच्या मोहीमेला वेग, ‘या’ तारखेपर्यंत थकबाकी भरल्यास होणार 50 टक्के बिल माफ!

| Updated on: Aug 20, 2021 | 8:02 PM

कोरोनाकाळात ग्राहकांकडे वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्याचं समोर आलं आहे. वारंवार विनंती आणि सूचना करूनही ही थकबाकीचा भरणा होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतल्या ग्राहक आणि कृषिपंपांच्या वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल 8 हजार 504 कोटींच्या घरात गेली आहे.

थकबाकीदारांचा वीज पुरवठा तोडण्याच्या मोहीमेला वेग, या तारखेपर्यंत थकबाकी भरल्यास होणार 50 टक्के बिल माफ!
महावितरण
Follow us on

पुणे : कोरोनाकाळात ग्राहकांकडे वीजबिलांची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहिल्याचं समोर आलं आहे. वारंवार विनंती आणि सूचना करूनही ही थकबाकीचा भरणा होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतल्या ग्राहक आणि कृषिपंपांच्या वीजबिलांची थकीत रक्कम तब्बल 8 हजार 504 कोटींच्या घरात गेली आहे. (During the Corona period, consumers have been facing huge arrears of electricity bills)

थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याच्या मोहीमेला वेग

वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक घडी विस्कटल्याचं चित्र आहे. ग्राहकांकडे हजारो कोटींची थकबाकी राहिल्याने महावितरणला मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या वाहतुकीवरही मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याच्या मोहीमेला वेग देण्यात आला आहे.

कृषीपंपधारकांकडे थकबाकीची रक्कम मोठी

काही दिवसांपासून विजेची वाढती मागणी 20 ते 21 हजार 500 मेगावॅटवर स्थिरावली आहे. परंतु आर्थिक परिस्थिती संकटात असतानाही महावितरणकडून विजेच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्याचा प्रयत्न होत आहे. घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांपेक्षा कृषीपंपधारकांकडे असलेली थकबाकीची रक्कम मोठी आहे. सध्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातल्या 24 लाख घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 1 हजार 23 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर 7 लाख 39 हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे 7 हजार 481 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

… तर कृषिपंपधारकांची ५० टक्के थकबाकी माफ

कृषिपंप वीज धोरणामधून पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 12 लाख 44 हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांना थकबाकीमध्ये एकूण 2 हजार 643 कोटी रुपयांची महावितरणकडून विलंब आकार आणि व्याजातून सूट देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांकडे आता सुधारित 8 हजार 175 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातली 50 टक्के थकबाकी ही येत्या मार्च 2022 पर्यंत चालू वीजबिलासह भरल्यास उर्वरित 50 टक्के थकबाकीही माफ केली जाणार आहे.

सरकार, महावितरणने घेतली होती नरमाईची भूमिका

एप्रिल महिन्यात वीज बिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 14 लाख ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचे निर्देश पुणे विभागीय संचालकांनी दिले होते. यावरून ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. विरोधी पक्षांनी याविरोधात आंदोलनेही केली होती. त्यानंतर सरकार आणि वीज वितरण कंपनीने नरमाईची भूमिका घेतली होती.

संबंधित बातम्या :

नांदेडमधील आंदोलन भाजप पुरस्कृत, संभाजी छत्रपतींच्या आडून भाजपचा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न; अशोक चव्हाणांचा आरोप

त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो; खासदार संभाजी छत्रपतींचा मोठा गौप्यस्फोट

नाशिकच्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव द्या; आठवले दिल्लीत मंत्र्यांना भेटणार