पुणे : अंमलबाजावणी संचालनालयाचे (ed raid) पथक छत्रपती संभाजीनगरात पोहचले. छत्रपती संभाजी नगरात 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. शासकीय योजनेतील घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई केली जात आहे. एक हजार कोटींचा घोटाळ्यासंदर्भात हा छापा असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता पुणे शहरात पोहचले आहे. पुणे शहरातील पाच ठिकाणी ईडीच्या पथकाने छापे मारले आहे. पुणे अकोला आणि छत्रपती संभाजीनगर येथे एकाच वेळी ही छापेमारी सुरु आहे. यामुळे पुणे आणि छत्रपती संभाजीनगर कनेक्शनची चर्चा सुरु झाली आहे.
काय आहे प्रकरण
छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. या योजनेत टेंडर भरणाऱ्या कंपन्यांनी एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरले. महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी झाली. आता ईडीने या प्रकरणात छापे टाकले आहे. छत्रपती संभाजीनगरातील नऊ ठिकाणी आणि पुण्यातील पाच ठिकाणी हे छापे टाकले गेले आहे. पुण्यातील महमदवाडी, येरवाडा तसेच पुणे शहरात ५ ठिकाणी ईडीची मोठी छापेमारी सुरू आहे.
कुठे पडले छापे
छत्रपती संभाजीनगरातील समरथ कन्स्ट्रक्शन अँड जे.व्ही, इंडो लग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस आणि सहयोगी कंपन्या यांनी एकाच संगणकावरून निविदा भरल्या होत्या. या कंपन्यांनी शासनाची फसवणूक केली. त्यांनी महापालिकेचा पंतप्रधान आवास योजनेचा प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. हा प्रकल्प चार ठिकाणी सुरू करण्यासाठी चार निविदा आल्या होत्या.
यातील एक कंपनी बंद झाली तर उरलेल्या तीन कंपन्यांनी संगनमत करून या निविदा भरल्या होत्या, असं मनपाच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या कंपन्यांशी संबंधात पुण्यात छापेमारी सुरु आहे का? दुसरे काही प्रकार आहे, याची माहिती मिळाली नाही. परंतु घरकुल योजनेसंदर्भातच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ED ची छत्रपती संभाजी नगरात नऊ ठिकाणी छापेमारी, काय आहे प्रकरण