कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपुर्वी अंमलबजावणी संचालयाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील (Kolhapur District Bank) काही आजी माजी संचालकांची चौकशी केली होती. ईडीने (ed) जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता पुन्हा ईडीचे पथक कोल्हापुरात पोहचले आहेत. या पथकाने तीन माजी संचालकांची चौकशी सुरु केली आहे. सर्जेराव पाटील पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे अशी त्यांची नावे आहेत.
हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी तब्बल अकरा तास मुश्रीफांच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. ईडी अधिकारी त्यावेळी काही महत्त्वाचे कागदपत्रे घरातून घेऊन गेल्याची माहिती समोर आली होती.
बँकेत तपासणी
मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेतही धाड टाकली. या धाडीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर थेट पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. या चौकशीमुळे कर्मचारी तणावात होते. बँकेत काम करत असताना सुनील लाड या कर्मचाऱ्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता.
तिघांची चौकशी सुरु
ईडीचे पथक शनिवारी कोल्हापुरात पोहचले. या पथकाने तीन माजी संचालकांची चौकशी सुरु केली आहे. सर्जेराव पाटील पेरीडकर, अनिल पाटील आणि विलास गाताडे अशी त्यांची नावे आहेत. ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणात तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर तिघांना ईडीने समन्स बजावले आहे.
मुलांच्या जमीनला विरोध
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली होती. यावर ईडीने त्यांच्या जामीन अर्जावर विरोध केला. अटकपूर्व जामीन दिला तर तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत ईडीने विरोध केला.
विरोधकांवर ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या जात असल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या आरोपांना भारतीय जनता पक्षाकडून कर नाही तर डर कशाला? असे सागंत उत्तर दिले जात आहे.