पुणे, | 17 ऑक्टोंबर 2023 : मॉन्सून यंदा उशिराने आला. नेहमी 7 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होणारा मॉन्सून 25 जून रोजी दाखल झाला. त्यानंतर जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस पावसाने दडी मारली. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला तरी बऱ्यापैकी बरसला नाही. यामुळे यंदा जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने निर्माण केलेली तूट भरुन निघाली नाही. भारतीय मॉन्सूनवर यंदा एल निनोचा प्रभाव होता. आता यंदा उन्हाळा कसा असणार? या संदर्भात हवामान विभागाने अपडेट दिले आहे. यंदा उन्हाळ्यात ‘सुपर एल निनो’चा प्रभाव असणार आहे.
पावसाळ्यानंतर उन्हाळ्यात ‘सुपर एल निनो’चा प्रभाव असणार आहे. मार्च ते मे 2024 मध्ये ‘सुपर एल निनो’चा प्रभाव दिसणार आहे. यामुळे सरासरी तापमान 1.5 डिग्री सेल्सियस जास्त असणार आहे. सरासरी तापमान 2 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असण्याची शक्यताही 30 टक्के आहे. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थितीची तीव्रता वाढल्याचा हा परिणाम आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमोस्फेरिक एडमिनिस्टेशन’ (नोआ) या संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. यासंदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. यापूर्वी या संस्थेने यंदाच्या पावसाळ्यात भारतात ‘एल निनो’चा प्रभाव असण्याचे म्हटले होते.
‘सुपर एल निनो’चा प्रभाव भारतात यापूर्वी सात, आठ वर्षांपूर्वी होता. 1997-98 मध्ये ‘सुपर एल निनो’ होता. त्यानंतर पुन्हा 2015-16 मध्ये ‘सुपर एल निनो’चा प्रभाव होता. ‘सुपर एल निनो’मुळे वाढलेले तापमान, दुष्काळ आणि पूर अशी आपत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच या ‘सुपर एल निनो’मुळे भारतातील मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘सुपर एल निनो’मुळे भारतातील हवामान प्रणालीत मोठा बदल होण्याचा धोका आहे. या परिस्थितीत तीव्र हवामान घटना घडतात. कधी काही भागात मुसळधार पाऊस पडतो. तर कुठे तापमान जास्त असते. तसेच पावसात मोठा खंड पडतो. उत्तर भारतात ‘सुपर एल निनो’चा धोका दक्षिण भारतापेक्षा अधिक आहे. हवामान विभागाच्या या इशाराऱ्यानंतर अन्नधान्याचा साठा सरकारला करुन ठेवावा लागणार आहे.