पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुणे ते दौंड नियमित ये-जा करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. नियमित काम आणि नोकरी निमित्त अनेक जण प्रवास करतात. अनेक विद्यार्थी दौंडवरुन पुण्याला शिक्षणासाठी येतात. या सर्वांना रेल्वे हाच महत्वाचा आधार असतो. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे. लवकरच पुणे ते दौंड दरम्यान इलेक्ट्रीक लोकल धावणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला आहे.
सध्या पुणे-दौंड मार्गावर डेमू (डिझेलवरील) गाड्या सुरु आहेत. या गाड्यांचे रुपातंर पुणे-लोणावळा लोकलसारखे करण्यात येणार आहे. म्हणजेच डेमू ऐवजी इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या मेमू गाड्या सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पुणे ते दौंड दरम्यान वाहतुकीचा वेग वाढणार आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक चांगली रेल्वेसेवा मिळणार आहे. या मार्गावर मेमू गाड्या सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी यामुळे पूर्ण होत आहे.
पुणे ते दौंड मार्गाचे विद्युतीकरण होऊन चार वर्षे झालीत. या मार्गावर लोकलची म्हणजे मेमू गाड्याची चाचणीही घेण्यात आली होती. मात्र अजूनही इलेक्ट्रिक लोकल सुरू झालेली नाही. यासंदर्भात प्रवासी संघटना सातत्याने लोकप्रतिनिधी आणि रेल्वेकडे मागणी करत होती. त्यानंतर आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. यामुळे या मार्गावर लवकरच इलेक्ट्रीक लोकल धावणार आहे.
मेमू म्हणजे इलेक्ट्रिक लोकल सुरु झाल्यामुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. कमी वेळेत पुणे ते दौंड आंतर गाठता येणार आहे. डिझेल ऐवजी इलेक्ट्रीक इंजिन वापल्यामुळे इंधनाची बचत होणार आहे. लोणावळा लोकलसारख्या १२ डब्यांचा या गाड्या असणार आहेत. यामुळे प्रवाशी संख्याही वाढणार आहे. लवकरच या गाड्या सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली. त्यामुळे हजारो प्रवाशांना दिलासा मिळला आहे.