पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : दारुची नशा काही वेगळीच असते. अती मद्यपान केल्यानंतर एखादा व्यक्ती काय करेल, हे काहीच सांगता येत नाही. मग दारुची नशा उतरल्यावर आपण काय, काय केले होते? त्याची माहिती त्याला नसते. एका मद्यधुंद अधिकाऱ्याचा वेगळाच प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी एक्साईज डिपार्टमेंटचा आहे. आता व्हायरल झालेले हे प्रकरण संबंधित विभागापर्यंत पोहचल्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
पुणे येथील ड्रामा नाईन हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या हॉटेलमध्ये फुकटच्या मद्यासाठी एका अधिकाऱ्याने धिंगाणा घातला. हा अधिकारी चक्क एक्साईज डिपार्टमेंटमधील होता. विकास अबने असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने ड्रामा नाईन हॉटेलमध्ये जाऊन दारूची मागणी केली. हॉटेल बंद असताना त्याने दारूची मागणी केली. त्यावेळी हॉटेलच्या मॅनेजर सांगितले की, हॉटेल बंद झाले आहे. यामुळे आता दारु देता येणार नाही. परंतु तो अधिकारी काहीच ऐकण्याच्या मनस्थित नव्हता.
फुकटच्या दारुसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याने घातला धिंगाणा…व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/9nek4T9UnZ
— jitendra (@jitendrazavar) October 16, 2023
दारु मिळत नसल्यामुळे विकास अबने याने हॉटेलच्या मॅनेजरशी वाद घालणे सुरु केले. त्यावेळी हॉटेलचे इतर कर्मचारी जमा झाले. यावेळी वाद वाढत गेला. त्यानंतर विकास अबने याने हॉटेल मॅनेजर आणि वेटरला मारहाणही सुरु केली. ही घटना हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्याचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकास अबने मद्यधुंद अवस्थेत होते, असे सांगितले जात आहे.
विकास अबने या एक्साईज डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्याने हॉटेलबाहेर एका जोडप्याला मारहाण केल्याची बाब उघड झाली आहे. परंतु या प्रकाराची पोलीस ठाण्यात अजून नोंद झालेली नाही. व्हायरल झालेल्या या प्रकारानंतर एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.