पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरातील गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास जूनअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 31 डिसेंबर 2020पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी (Construction Regularize) अर्ज करण्याकरिता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत नागरिकांना अर्ज करता येतील, अशी माहिती बांधकाम परवानगी विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान 20 डिसेंबर 2021पासून चार महिन्यात नियमितीकरणासाठी केवळ 950 अर्ज आले आहेत. नागरिकांनी पाठ फिरवल्याने मुदतवाढ देऊनही योजनेला वेग येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात एक लाखांहुन अधिक अनधिकृत बांधकामे (Illegal construction) आहेत. काही कागदपत्रांची पूर्तता करत ती नियमित करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे, मात्र त्याला प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महापालिका हद्दीतील 31 डिसेंबर 2020पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001मध्ये सुधारणा करून अधिनियम 12 मार्च 2021ला आणि शुल्क निश्चितीचा आदेश 18 ऑक्टोबर 2021ला काढला. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहे. महापालिकेने 20 डिसेंबर 2012 ते 21 फेब्रुवारी 2022पर्यंत नागरिकांकडून अर्ज मागवले होते. यावेळी 510 अर्ज आले. फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
नागरी सुविधा केंद्रात सध्या अर्ज स्वीकारले जात आहेत. या अर्जासोबत मालकी हक्कासाठी सातबारा उतारा त्यासोबतच इतर महत्त्वाची कागदपत्रे, बांधकाम 31 डिसेंबर 2020पूर्वी बांधून पूर्ण झाल्याबाबतचा कर संकलन विभागाचा दाखला, मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी दाखला, पाणीपुरवठा थकबाकी नसलेला दाखवा, जलनिस्सारण विभागाचा ड्रेनेज कनेक्शन दाखला, इमारतीचा प्लॅन, क्रॉस सेक्शन, साइट प्लॅन यासह विविध दाखले आणणे गरजेचे आहे.