पुणे | 10 नोव्हेंबर 2023 : दिवाळी सण आता सुरु होत आहे. या सणामुळे अनेक जण आपल्या गावी जातात. त्यासाठी रेल्वे तिकीटांची बुकींग तीन महिन्यांपूर्वी काही जणांनी करुन ठेवली आहे. परंतु अनेकांना रेल्वे तिकीट मिळाले नाही. त्यांना पर्याय खासगी प्रवासी वाहतुकीचा आहे. दिवाळीतील गर्दीचा फायदा घेत खासगी बसच्या तिकीट दरात भरमसाट वाढ करण्यात आली आहे. अगदी काही ठिकाणी विमान प्रवासापेक्षा खासगी बसचे दर जास्त आहे. दिवाळीतील गर्दीमुळे खासगी बस वाहतुकीचे चांगभले होत असून सामान्य प्रवाशांचे दिवाळे निघत आहे. परिवहन विभागाकडून यासंदर्भात काहीच पावले उचलली गेली नाही. राज्य परिवहन महामंडळाने ज्याप्रमाणे दहा टक्के दरवाढ केली आहे, त्यापद्धतीने कोणतीही मर्यादा खासगी वाहतूकदारांना नाही.
पुणे ते जळगाव प्रवासाचा तिकीटदर ४०० ते ९०० रुपयांवरून थेट २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. परंतु जळगाव ते पुणे तिकीट दर ४०० रुपये आहे. पुणे ते नागपूर तिकीटाचे दर ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत आहे. तसेच नागपूर ते पुणे तिकीट दर ६०० ते ७०० रुपये आहे. पुण्यावरुन गावी जाणाऱ्या लोकांची असलेल्या गर्दीमुळे तिकीट दर दुप्पटीपेक्षा जास्त वाढले आहे तर गावावरुन पुण्याकडे येणारे कोणी नसल्यामुळे तिकीट दर कमी आहे. पुणे येथून जळगाव किंवा नागपूर जाण्यासाठी कमी रेल्वे असल्याचा फायदा खासगी बस वाहतूक करणारे घेत आहेत. जळगाव पुणे विमानसेवा नाही. परंतु जळगाव, मुंबई विमानसेवेचे तिकीट २५०० रुपये आहे. यामुळे बसपेक्षा विमानप्रवास स्वस्त आहे, असे म्हणावे लागले.
पुणे ते जळगाव प्रवासात थेट नागपूरपासून ते धुळ्यापर्यंत जवळपास चारशेच्यावर बसेस ये-जा करीत आहेत. त्या बस वाहतूकदारांची लॉबी सक्रिय आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मोठी दरवाढ केली आहे. या लॉबीपुढे राज्यातील परिवहन विभागाही लाचर झाले आहे. खासगी बस मालक मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. त्यानंतर परिवहन विभागाकडून काहीच कारवाई केली गेली नाही.