अभिजित पोते, पुणे, दि. 21 फेब्रुवारी 2024 | पुणेकर अनेक गोष्टींमध्ये आघाडीवर असतात. त्यामुळे पुणे शहराची आणि पुणेकरांची चर्चा देशभर होत असते. पुणेकरांनी सुरुवात केलेल्या नावीन्यपूर्णतचे नेहमी इतरत्र कौतूक होत असते. परंतु पुणेकरांसाठी आज आलेली बातमी चांगली नाही. सर्व ठिकाणी आघाडी घेणाऱ्या पुणेकरांनी अस्वच्छतेसाठी आघाडी घेतली आहे. यासंदर्भातील गेल्या २० दिवसांतील आकडेवारी समोर आली आहे. यामुळे आता पुणेकरांना विचार करावा लागणार आहे आणि अस्वच्छतेविरुद्ध मोहीम सुरु करुन ही आघाडी मोडून काढावी लागणार आहे.
अस्वच्छतेसाठीचा दंड भरण्यात पुणेकर अव्वल आले आहे. पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या नागरिकांवर महापालिकेकडून दंड आकारण्यात येतो. पुणेकरांनी गेल्या २० दिवसांत तब्बल २२ लाख ८ हजार रूपयांचा दंड भरला आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्या ३ हजार ८ नागरिकांकडून पुणे महापालिकेने केला दंड वसूल केला आहे.
शहरात महापालिकेकडून दररोज मोठया प्रमाणात स्वच्छता केली जाते. परंतु पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. अशा नागरिकांवर महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून दैनंदिन स्वरूपात कारवाई केली जाते. त्यांच्याकडून २० दिवसांत तब्बल २२ लाख ८ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छ शहरांचे क्रमवारी जाहीर केले जाते. त्यात इंदूर पहिल्या क्रमांकावर आहे. इंदूरबरोबर सुरत शहर संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आले आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु सर्व गोष्टीत आघाडी घेणारे पुणे शहर दहाव्या क्रमांकावर आहे. यामुळे पुणे शहर स्वच्छ करण्याचा चंग मनपाने केला आहे. त्यासाठी इंदूरमध्ये जाऊन अभ्यास करण्यात आला आहे. त्याला आता पुणेकरांची साथ हवी आहे. त्यानंतर पुणे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर होऊ शकते.