योगेश बोरसे, पुणे, दि. 20 नोव्हेंबर | पुणे शहरात कोयता गँगचा (koyta gang) अधुनमधून धुडघुस सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात (Crime News) धडक कारवाया केल्यानंतर गुन्हेगारांचे हल्ले सुरुच असतात. पुणे पोलिसांनी कोयता गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक केली. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. तसेच काही जणांना हद्दपार करण्याची कारवाई झाली. त्यानंतर चोरी, दोरोडे या घटनाही वाढत आहेत. आता रविवारी सर्वत्र क्रिकेटचा जल्लोष सुरु असताना पुणे शहरात गोळीबार झाला. या घटनेत एक जण गंभीर झाला. पुण्यातील बाणेर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्व परिसर हादरला होता. तसेच पुणे परिसरात दिवाळी दरम्यान अनेक ठिकाणी घरफोडी झाली. त्यात लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पुणे येथील बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ किरकोळ वादातून गोळीबाराचा थरार झाला. आकाश पोपट बाणेकर आणि रोहित ननावरे यांच्या रविवारी मध्यरात्री किरकोळ वाद झाला. त्यानंतर रोहित याने आकाशवर सरळ गोळी चालवली. रविवारी मध्यरात्री ही घडली आहे. गोळीबारामुळे आकाश बाणेकर जखमी झालेला झाला. त्याला कासारसाई येथील एका रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी रोहित ननावरे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चतुशृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जुलै महिन्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा गोळीबार झाला आहे.
पुणे शहरात गोळीबार झाल्याच्या घटनेबरोबर अनेक ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. दिवाळीच्या दिवसांत पुण्यातील घरे बंद असल्याचा फायदा घेत अनेक भागात घरफोड्या झाल्या आहेत. शहराच्या विविध भागातील सदनिकांमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली. पुण्यातील केशवनगरमध्ये घरफोडीत १३ लाखांचा ऐवज चोरी झाली. या प्रकरणी गोपाल झा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुसरीकडे कर्वेनगर भागात चोरट्याने सदनिकेचे कुलूप तोडून बेडरूमधील कपाटातून ३० हजारांची रोकड लंपास केली.