पुणे | 2 डिसेंबर 2023 : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. बच्चे कंपनीपासून ज्येष्ठापर्यंत अनेकांना आंब्याची गोडी चांगलीच आवडते. त्यातच हापूस आंबा अधिकच चवदार असल्यामुळे त्याला मागणी मोठी असते. देशात नाही विदेशात हापूस आंब्याला मागणी येते. आता हापूस आंबाचा थटात बाजारात दाखल झाला आहे. पुणे बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आली आहे. देवगड हापूसच्या आगाप उत्पादनातील आंब्याची पहिली आवक पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये आली आहे. आंब्याची पहिली पेटी घेण्यासाठी ग्राहकांनी बोली लावली. त्यामुळे हापूसच्या पहिल्या पेटीला उच्चांकी दर मिळाला.
हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीचा लिलाव आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या गाळ्यावर झाला. त्यांच्याकडे देवगड हापूसच्या पाच पेट्या आल्या. या पाच पेट्यांपैकी पाच डझनच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रुपये दर मिळाला. त्या खालोखाल इतर पेट्यांना १५ हजार आणि ११ हजार दर मिळाला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक खूश झाले.
हापूस आंब्याची पहिली पेटी घेण्यासाठी ग्राहकांमध्ये चांगलीच चढाओढ लागली. अखेर कोथरुडमधील रहिवाशी जोतिराम बिराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी या आंब्याची खरेदी केली. देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा होता. हंगामपूर्व उत्पादनातील आंब्याची ही पहिली आवक होती. प्रत्येक वर्षी सुरुवातीलाच आब्यांची पेटी दाखल होते. आता टप्पाटप्याने देवगड हापूसचा हंगाम सुरु होऊन फेब्रुवारीपासून नियमित हंगाम सुरु होणार आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक होऊन ग्राहकांना चव चाखता येणार आहे.
कोकणातील हापूस पुणे शहरात आलेला असताना कोल्हापूरात हापूस आला आहे. पण हा आंबा दक्षिण आफ्रिका येथील मालावी शहरातून आलेला आहे. दक्षिण आफ्रिकेतून सध्या १० पेट्या कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. १५ आंबे असलेल्या एका पेटीची किंमत ३८०० रुपये आहे. कोकणातील हापूसची कलम आफ्रिकेत नेली होती.