Lonavala Bhushi Dam: पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच म्हणजेच २७ जून रोजी या कुटुंबाकडे लग्न होते. त्यानंतर दोन दिवसांनी २९ जून रोजी वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम झाला. मग लग्नसाठी आलेल्या पाहुण्यांनी पर्यटनास जाण्याचा बेत ठरवला. पुणे शहराजवळ असलेल्या लोणावळा येथील निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचे ठरले. त्यानुसार ३० तारखेला या कुटुंबियातील १७ जणांनी एका खासगी ट्रव्हल्सने लोणावळा गाठले. लोणावळ्यात दुपारी १२ वाजता पोहचले.
सर्व जण पर्यटन आणि धबधब्यांचा आनंद घेत होते. त्यापैकी काही जण पाण्याच्या प्रवाहाच्या मधोमध जाऊन पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद लुटत होते. परंतु अचानक काही वेगळे घडले आणि त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुणे शहरातील अन्सारी कुटुंबातील साहिस्ता लियाकत अन्सारी (वय- 36), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 13), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय- 8) अदनान अन्सारी (वय- 4), मारिया अन्सारी (वय- 9) या पाच जणांचा लोणावळ्यात बुडून मृत्यू झाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंगावर शहारे निर्माण कराणारा हा व्हिडिओ आहे. पाण्याचा मधोमध हे कुटुंबीय एकमेकांना घट्ट पकडून उभे होते. त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. मग त्या प्रवाहाने त्यांना सावरण्याचा वेळच दिला नाही. सर्वच सर्व जण पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेले. त्यातील काही जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, पाच जणांचा मृत्यू झाला.
लोणावळामध्ये पाण्याच्या प्रवाहात पाच जण असे वाहून गेले…#Lonavala #Pune pic.twitter.com/UTBtUCUFy3
— jitendra (@jitendrazavar) July 1, 2024
लोणावळ्यातील भुशी धरण बॅक वॉटरफॉल दुर्घटनेनंतर आता प्रशासन जागे झाले आहे. पाच जण वाहून गेल्यानंतर आता या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर व जंगल परिसरात आता बोर्ड लावण्यात येणार आहेत. एकूण 10 बोर्ड या परिसरात लावण्यात येणार आहेत. नागरिकांसाठी जाहीर सूचनेचे हे फलक असून सेंट्रल रेल्वे भुशी डॅम यांच्याकडून हे फलक लावण्यात येणार आहेत. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हे फलक लावण्यात येणार आहेत.