पुणे, दि.20 जानेवारी 2024 | पुणे येथील लोहगाव विमानतळावर प्रवासांसाठी नवीन टर्मिनल सुरु करण्यात येणार आहे. या विमानतळावर नवीन टर्मिनल सुरु झाल्यामुळे विमानांची संख्या वाढणार आहे. परंतु हे नवीन टर्मिनल प्रवाशांसाठी अडचणी ठरण्याची चिन्ह होती. कारण या टर्मिनलवरुन कॅबपर्यंत जाण्यासाठी जवळपास सहाशे मीटर पायी चालत जावे लागत होते. परंतु आता पुण्यातील लोहगाव विमानतळाकडून ही अडचण दूर करण्यात आली आहे. प्रवाशांना नवीन टर्निनलवरुन एरोमॉल येथे जाण्यासाठी दहा गोल्फ कार्टसह बसची सुविधा केली आहे. त्यामुळे प्रवाशांना पायपीट करावी लागणार नाही.
नवीन टर्मिनल फेब्रुवारीच्या पंधरवाड्यात सुरु होणार आहे. परंतु प्रशासाने कॅबला पिकअपसाठी परवानगी नाकारली आहे. यामुळे ५७० मीटर प्रवाशांना पायी जावे लागणार होते. त्यामुळे विमानतळ प्रशासनने प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीने बदल केला आहे. प्रवाशांसाठी गोल्फ कार्ट आणि बसची सुविधा मोफत दिली आहे. यामुळे प्रवाशांना कॅबसाठी एरोमॉलपर्यंत बसने जात येणार आहे. प्रवाशांची पायपीट थांबणार आहे.
‘एरोमॉल’ साठी दोन पर्याय तयार करण्यात आले आहे. जुन्या टर्मिनलमधून एरोमॉलला जाण्यासाठी पादचारी पूल बांधला आहे. या पुलावर जाण्यासाठी सरकता जिना व लिफ्टची सोय करण्यात आली आहे. पादचारी पुलावर प्रवाशांना सामान घेऊन चालावे लागू नये म्हणून ट्रॅव्हलेटरची देखील सोय केलेली आहे. एरोमॉल गाठता येणार आहे. तसेच गोल्फ कार्ट व लो फ्लोअर बसची सोय करण्यात आली आहे. तसेच टर्मिनलच्या बाहेर असणाऱ्या मुख्य रस्त्यावरुन प्रवाशांना एरोमॉल गाठता येणार आहे.
विमानतळाच्या परिसरात टर्मिनलबाहेर होणारी कोंडी फोडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी येथील वाहतूक व्यवस्थेत बदल केला गेला होता. प्रशासनाने टर्मिनल बाहेर ५० मीटरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळे प्रवाशांना कॅब मिळविण्यासाठी पायपीट करावी लागत होती. तसेच नवीन टर्मिनलच्या बाहेर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून हवाईदलाची अर्धा एकर जागा घेण्यात आली आहे. यामुळे विमाननगरकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा होत आहे. प्रवाशांना विमानगर जाण्यासाठी आता फेऱ्याने जाण्याची गरज पडणार नाही. याठिकाणी हवाईदलाची असलेली संरक्षक भिंत पाडली जाणार आहे.