पुणे – मागील काही काळापासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. जुन्नर, आंबेगाव, मावळ याभागात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत असते. बिबट्याने त्या परिसरातील नागरिकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. अश्यातच आता कात्रज घाटातही बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे समोर आले आहे.
वन कर्मचाऱ्यांना दर्शन
रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे. रात्री गस्त घालत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संरक्षक भिंतीवर बसलेल्या बिबट्याचे फोटो मोबाईलमध्ये कैद केले आहेत. कात्रज घाटाच्या बाजूला असलेल्या भिलारेवाडी, मांगडेवाडी, गूजरवाडी, निंबाळकरवाडी या गावांमध्ये बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन बिबट्यांना पिंजरा लावून पकडले आहे. मात्र अजूनही या भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.
वन विभागाने केले हे आवाहन
कात्रज घाटात बिबट्याचा वावर आढळून आल्याने वनविभाग सर्तक झाला आहे. यामुळे वन विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. याबरोबर रात्रीच्या वेळी कात्रज घाटाच्या परिसरात न फिरण्याचेही आवाहनही करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील डिंभे कालव्यात बिबट्याचा बछडा आढळून आला होता. स्थानिक नागरिकांना त्या बछड्याची माहिती वन विभागाला देत तो वन विभागाच्या ताब्यातही दिला होता. तसेच त्याच परिसरात बिबट्याचे दोन बछडे खेळत-खेळत शेतकऱ्याच्या अंगणापर्यंत आले होते. आणखी एका ठिकाणी ऊस तोडणी करताना मादी बिबट्यासह बछड्यांचे दर्शनही स्थानिक नागरिकांना झाले होते.
Pimpri Crime| कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार देणे मालकाला पडले महागात ; कामगाराने पेटवले थेट दुकान
प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा