पुणे | 7 सप्टेंबर 2023 : राज्यात काही दिवसांत गणेशोत्सव सुरु होणार आहे. १९ सप्टेंबरपासून दहा दिवस भक्तीभावाचे असणार आहेत. सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पुणे, मुंबई शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण वेगळेच असते. परंतु यंदा गणेशोत्सवाच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली जाणार आहे. पुणे शहरात सार्वजनिक गणेश मंडळ गणेशोत्सवाच्या कामाला लागले असताना राजकीय पक्ष संधी साधत शक्तीप्रदर्शन करणार आहे. महायुतीकडून त्याची तयारी सुरु केली आहे. भाजपने यासंदर्भात बैठक घेऊन रणनीती तयार केली आहे.
पुणे शहरात भाजपने गणेशोत्सवात शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी चालवली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपकडून केंद्रीय पातळीवरुनच सुरु झाली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही कधीही जाहीर होऊ शकतात. या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपने आणि महायुतीने तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवाचा लाभ भाजप यासाठी घेणार आहे.
भारतीज जनता पक्षाची पुणे शहराची कार्यकारणी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कार्यकारणी गणेशोत्सवाच्या आधी करण्यात येणार आहे. यासंदर्भात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची बैठक झाली. या बैठकीत पक्ष वाढीवर चर्चा झाली. तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने पक्ष जास्तीत, जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आराखडा तयार केला गेला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचण्यात येणार आहे.
पुणे गणेशोत्सवात महायुती शक्तीप्रदर्शन करणार आहे. या गणेशोत्सवासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते अन् उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांना बोलवण्यात येणार आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले गेले. त्यांनीही गणेशोत्सवात पुणे शहरात येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भाजपकडून निमंत्रण दिले जाणार आहे. यामुळे पुणे शहरात गणेशोत्सवात महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार आहे.