विनय जगताप, पुणे | 21 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविकांची हजेरी असते. पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यामुळे अनेक गणेश मंडळांचे दर्शन २४ तास सुरु असते. पुणे शहरातील सार्वजनिक मंडळांचा असा उत्साह असताना घरगुती गणपतीही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पुण्यातील धायरमध्ये मिलिंद पोकळे यांनी घरगुती गणपतीसमोर केलेला देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहे.
पुणे येथील धायरीमधील मिलिंद पोकळे यांनी क्रिकेट सामन्याचा देखावा साकारला आहे. त्यांनी आपल्या घरातील गणपतीसमोर आयपीएल क्रिकेटची आरस तयार केली आहे. आयपीएलचा थरार एका रंगतदार सामन्यातून दिसत आहे. या आरासमध्ये प्रेक्षक गॅलरी तयार केली आहे. क्रिकेटर्सच्या माहितीचे दालन उभारले आहे. डे नाईट प्रकाशझोताचा सामना तयार करुन लाईव्ह प्रेक्षपणाची हुबेहूब मांडणी साकारली आहे.
गणरायचे वाहन असलेला मूषक खेळाडू म्हणून दाखवण्यात आले आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना गणेशाच्या वेशभूषेत फलंदाजी करताना दाखवले आहे. तर मूषक यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करताना साकारले गेले आहेत. ही आरास पाहण्यासाठी सिंहगड रोडच नव्हे तर पुणे शहरातून भाविक गर्दी करत आहे. आगामी वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवा, अशी मागणी मिलिंद पोकळे कुटुंबियांनी गणरायाकडे केली आहे.
धायरी येथे कॉसमास बँकेचे संचालक मिलिंद पोकळे आणि जिजामाता महिला बँकेच्या माजी उपाध्यक्षा रेखा पोकळे यांचा मुलगा समर्थ याची ही कल्पना होती. त्याने घरातील वीस फुट लांबी रुंदीच्या हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम तयार केले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभरात क्रिकेटसंदर्भात जागृती व्हावी, तसेच मुलांना क्रिकेटची जवळून ओळख व्हावी यासाठी ही आरस तयार केल्याचे समर्थ याने सांगितले. आरास पाहण्यासाठी येणाऱ्यांना समर्थ यासंदर्भातील माहिती देत असतो.