कुणाल जायकर, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेत आहे. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिचा प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल होतो. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनीही गौतमी पाटील हिच्यावर टीका केली होती. त्यानंतर ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनीही गौतमी पाटील हिच्यावर टीका केली. गौतमी पाटील हिने रघुवीर खेडकर यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. अगदी मोजक्या शब्दांमध्ये तिने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले होते इंदूरीकर महाराज
आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतोय. त्याचं काय खरं आहे, असं म्हटलं जातं. मात्र गौतमी हिने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिले जात नाही. असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. त्यावर गौतमी पाटील म्हणाली होती की, मी काय बोलणार त्यांच्याविषयी. फक्त गैरसमज नका करू. ते सांगतात तेवढं मानधन नाही. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममध्ये 11 मुली असतात. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही, असं गौतमी पाटील म्हणाले.
रघुवीर खेडकर यांची टीका
ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या लोककलेची गौतमी पाटील करू नका, असं आवाहन रघुवीर खेडकर यांनी केलं आहे. 100 कलावंतांच्या तमाशाला दोन लाख रूपये मानधन मिळेना. या चार पोरीना खोऱ्याने पैसा मिळत आहे, असे खेडकर म्हणाले होते.
खेडकर यांना गौतमी पाटीलने दिले उत्तर
गौतमी पाटील हिने खेडकर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले आहे. ती म्हणाली, मी कोणाकडून पाच लाख घेतले, त्यांना माझ्यासमोर आणा. असे काही नाही. माझी इतकी फी नाही आणि राहिला प्रश्न लावणीचा तर मी लावणी करत नाही. माझा डिजे नृत्याचा शो आहे, अशा मोजक्या शब्दांत गौतमी पाटील हिने खेडकर यांना उत्तर देऊन विषयावर पडदा टाकला.
हे ही वाचा
Gautami patil : गौतमी पाटील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात यु-टर्न, पोलिसांना मिळाला आरोपी पण…