पुणे : डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा ‘घुंगरु’ चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. गौतमी पाटील हिच्या ‘घुंगरु’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. गौतमी पाटील हिने देखील अनेकदा या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. हा चित्रपट कलाकारांवर आधारीत आहे. तसेच या चित्रपटात प्रेम कहाणी आणि थ्रीलही बघायला मिळण्याची शक्यता आहे. गौतमीचे चाहते अनेक दिवसांपासून तिच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. गौतमीचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती अभिनय क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. गौतमीच्या ‘घुंगरु’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाची रिलीज होण्याची तारीख ही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे लांबवण्यात आली आहे, अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.
‘घुंगरु’ चित्रपटाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “नमस्कार मी बाबा गायकवाड! घुंगरु चित्रपटाचा निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक. घुंगरु हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचं चित्रिकरण सात राज्यांमध्ये झालं आहे. या चित्रपटात गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट सगळ्यांनी थिएटरला जाऊन सर्वांनी पाहावा, अशी माझी सर्वांना विनंती आहे”, अशी प्रतिक्रिया बाबा गायकवाड यांनी दिली.
“चित्रपटाचं काम पूर्ण झालं आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ही पुढच्या आठ दिवसांत मी जाहीर करेन. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे थांबवलं आहे”, असं बाबा गायकवाड यांनी सांगितलं. पण पुढच्या आठ ते दहा दिवसांत चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित होईल”, असंही बाबा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
“चित्रपटाची कथा सांगून जमणार नाही. तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. तुम्हाला स्टोरी नक्की आवडेल याचा मला विश्वास आहे”, असं बाबा गायकवाड म्हणाले.
गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे राज्यभरात प्रसिद्ध झाली आहे. राज्यभरात गौतमीचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करतात. सबसे कातील गौतमी पाटील, असं ब्रीदवाक्य तिच्या चाहत्यांनी बनलेलं आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची इतकी गर्दी होते की पोलीस प्रशासनावर देखील दबाव निर्माण होतो. विशेष म्हणजे गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी महिला प्रेक्षकदेखील उपस्थित राहतात.