विनय जगताप, पुणे | 6 ऑगस्ट 2023 : राज्यातील राजकारणात गेल्या दीडवर्षांपासून अनेक घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीतून बाहेर पडताना एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप केला. त्यानंतर शिंदे गटातील ४० आमदारांनी भाजपसोबत येत सरकार स्थापन केले. आता अजित पवार निधी देत नसल्याचा पुन्हा आरोप झाला आहे. हा आरोप शिंदे गटातील नाही तर भाजप मंत्र्याने केला आहे. गेल्या २० वर्षांत अजितदादांनी माझ्या मतदार संघासाठी एका रुपयाचाही निधी दिला नाही, असे म्हटले आहे.
आज मैत्री दिवस आहे, अजितदादा आणि आमची मैत्री फार जुनी आहे.. आमची मैत्री आहे परंतु आमचा एकमेकांना राजकीय विरोध राहिला आहे. अजित पवार यांनी माझ्या मतदार संघासाठी गेल्या वीस वर्षात एक रुपयाचाही निधी दिला नाही. त्यांनी मला आव्हान दिले होते की मी निधी देणार नाही, अन् त्यांनी ते पाळले, असा आरोप भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला. यामुळे अजित पवार विरोधी आमदारांना निधी देत नाही, हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.
अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या फिटनेसचे कौतूक केले होते. त्याबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनीही अजित पवार यांचे कौतूक केले. अजितदाद सकाळी लवकर उठतात, असे त्यांनी सांगितले.
लोकशाही आहे म्हणून काही बोलता येणार नाही, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जे काही विधान केले त्यासंदर्भात ते प्रतिक्रिया देत होते. ते म्हणाले की, आपल्याकडे चुकीचा इतिहास मांडला जात आहेत. पेशवाईबद्दल देखील नको ते बोललले जाते.
नेमाडे यांच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली आहे. परंतु त्यांनी हा सर्व इतिहास कोठून आणला? आपण वयाने ज्येष्ठ आहात, यामुळे काहीही बोलावे हे योग्य नाही. हे तर औरंगजेबाची उदगतीकरणच आहे. तुमच्यासारखे साहित्यिक लोकांना चुकीचा इतिहास का सांगत आहात, असा प्रश्न गिरीश महाजन यांनी विचारला.