पुणे : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सातव्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांची बरीच कामं खोळंबली आहेत. नागरिक संतप्त झाले आहेत. कोल्हापूर येथील युवकांनी आम्ही अर्ध्या पगारात काम करण्यास तयार असल्याचं सांगून जुनी पेन्शन योजनेला विरोध केला. काही गावांमधून जुनी पेन्शन योजनेला विरोध होत आहे. सरकारी कर्मचाऱ्याचे पगार चांगले आहेत. शिवाय काही कर्मचारी दोन नंबरचे पैसे कमवतात. त्यांच्या पगाराला हात लागत नाही. अशावेळी त्यांना पेन्शनची गरज काय, असा सवाल गावकरी विचारत आहेत.
ग्रामपंचायतीने संपावरील कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवले आहे. पुणे जिल्ह्यातील रौंधळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. संप करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा निषेध करत जुनी पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना नाही तर शेतकऱ्यांना सुरू करा, अशी मागणी केली. रौंधळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नाना रौंधळ यांची पत्राद्वारे मागणी केली आहे. या पत्राची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा. राज्यातील शासकीय कर्मचारी वर्गाने जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि मागण्यांसाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. कर्मचाऱ्यांना गडगंज पगार आणि भ्रष्टाचार या सर्वांचा विचार करता यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे योग्य नाही. असा पत्रातील मजकूर आहे.
एकंदरित सरकारी कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर ठाम आहेत. पण, या मागणीला आता राज्यातील जनता विरोध करताना दिसून येत आहे. रौंधळवाडी येथील गावकऱ्यांनी पत्र लिहून पेन्शनची गरज कर्मचाऱ्यांना नसून शेतकऱ्यांना आहे, अशा आशयाचे पत्र थेट मुख्यमंत्री यांना लिहिले. त्यामुळे या पत्राची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
राज्यात बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. शेतकरी वर्षभर राबराब राबतो. त्यांना पिकाचा मोबदला योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पेन्शनची गरज आहे, असे या गावकऱ्यांनी पत्रात लिहिली आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.