पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना निरोध, तंबाखू, गुटखा, दगड कोंबलेले समोसे देण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ANI ने याविषयीचे वृत्त दिले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. कंपनीने एका कंत्राटदारांचं कंत्राट रद्द केले होते. त्या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. व्यवसाय आणि कंपनीवरचा राग यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोबाईल फर्मच्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात येतो. या फर्मने दुसऱ्या एका कंत्राटदाराला कँटिनला समोसा पुरविण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटो फर्मच्या काही कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थांविषयी तक्रार केली. समोस्यामध्ये निरोध, गुटखा आणि दगड मिळाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणात दोघांवर संशय व्यक्त केला. त्यांनीच समोस्यात कंडोम, गुटखा आणि दगड भरल्याचे समोर आले आहे.
27 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. कँटिनमध्ये कर्मचारी समोसा खात असताना त्यामध्ये निरोध, गुटखा, पान मसाला, दगड आढळले होते. कंत्राट रद्द केल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. समस्योत काही तरी मिसळून ठेकेदाराला बदनाम करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. पोलिसांनी प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. प्रकरणात पोलिस पुढील तपास करत आहेत.