पुणे : काळ बदलला, शतक बदलले. महिलांसाठी अनेक कायदे झाले. परंतु या कायद्यांची दहशत मानवतेला काळीमा फासणाऱ्यांना अजूनही वाटत नाही. यामुळेच महिलांच्या छळ व अत्याचाराच्या घटना घडत असतात. पुणे शहरातून आलेल्या या बातमीने हुंड्यासाठी व्यक्ती कुठल्या स्तरापर्यंत जाईल, हे दिसून येते. पुणे येथील कोथरुडमधील प्रकार अमानुष अत्याचाराचे आहे. विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. तिच्या डोळ्यात, तोंडात आणि कानात पाण्यात मिसळून मिरची पावडर टाकली गेली. या दोषींना कोणतीही न्यायालय माफ करणार नाही.
कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेवर हुंड्याच्या मागणीसाठी अमानुष अत्याचार करण्यात आले. त्या विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी सतत तिच्याकडे हुंड्याची मागणी लावून धरली. ती त्या महिलेच्या माहेरच्या मंडळींकडून पुर्ण झाली नाही.यामुळे तिला नेहमी मारहाण केली जात होती. केवळ मारहाणीवर हे कुटुंब थांबत नव्हते तर मिरचीचे पाणी तिच्या डोळ्यात, तोंडात आणि कानात टाकले जात होते. याप्रकरणी 22 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे.
कोण आहेत दोषी
महिलेच्या तक्रारीनंतर सासरच्या मंडळींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पती नागेश कार्तिक साहेबणे (वय 23), रत्ना कार्तिक साहेबणे (वय 42), महादेवी जाधव (वय 58 वर्षे), लिंबराज भिसे (वय 58 वर्षे) यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार तिचा विवाह नागेश कार्तिक साहेबणे यांच्याशी ऑक्टोबर 2021 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवस तिचा हुंड्यासाठी छळ करण्यात आला. हात-पाय बांधून डोळ्यात आणि कानात मिरचीचे पाणी टाकण्यात येत होते. आता या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे कायदा
हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ तयार करण्यात आला आहे. यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती, जिल्हा तसेच तालुकास्तरीय समित्यांची स्थापना या कायद्यांतर्गत करण्यात आली आहे.
हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शिक्षा – हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 च्या कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी रुपये 15,000/- अथवा अशा हुंडयाच्या मुल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
देशात हुंडा प्रतिबंधक कायदा तयार झाला असला तरी देशात अनेक ठिकाणी हुंड्यासाठी महिलाचा छळ होत असल्याचे प्रकार समोर येत असतात.