योगेश बोरसे, पुणे : देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये हाहा:कार माजला आहे. नवी दिल्लीत पावसाचा ४० वर्षांचा विक्रम तुटला आहे. यामुळे शाळा महाविद्यालयांना सुटी दिली आहे. आता पुन्हा उत्तर भारतात पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हिमाचल प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे हिमाचलमध्ये पुन्हा पावसाचे संकट असणार आहे.
हिमाचल प्रदेशात सुरु असलेल्या पावसामुळे मनाली चंदीगड महामार्ग बंद झाला आहे. हिमाचल प्रदेशात 13 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे उत्तराखंड राज्यातील शाळा कॉलेज पाच दिवस बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी पावसाने विश्रांती घेतली. सकाळपासून राजधानी दिल्लीत पावसाची हजेरी नाही.
राज्यात मान्सून स्थिरावला आहे. परंतु अद्यापही धरणातील पाणीसाठा पुरेसा झालेला नाही. राज्यातील धरणक्षेत्र अजूनही कोरडेच आहे. राज्यातील धरणांमध्ये केवळ २९% पाणीसाठा आहे. राज्यातील २४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. सर्वात कमी पाणीसाठा पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १७.६६ टक्के साठा आहे. विदर्भात पाऊस नसताना नागपूरमधील पाणीसाठा मात्र सर्वाधिक आहे. नागपूरमध्ये ४९ टक्क्यांपर्यंत जलसाठा पोहोचला आहे. सर्वाधिक भिस्त असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा ही १५.६५ टक्क्यांवर आहे.
राज्यात लहान मोठी २ हजार ९८९ धरणे आहेत. या धरणांमध्ये रविवारपर्यंत २९.१५ टक्के पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. राज्यात अजून समाधानकारक पाऊस झाला नसल्याने कोकणातल्या भातशेतीची वेळापत्रक १५ दिवस पुढे गेलंय.
कोकणात जून महिन्यात अवघा ३० टक्केच पाऊस झालाय. १ जूनपासून आजपर्यत 900 मिलिमिटर सरासरी पाऊस झालाय. परंतु आता कोकणातील धबधबे प्रवाहित झाले आहे. राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण इथला सवतकडा धबधबा प्रवाहित झाला आहे. यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षापर्यटनासाठी पर्यटक कोकणात येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले आहे. या धरणाचे 21 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे 81 हजार 620 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.