पुणे: गेल्या काही दिवसापासून अंगाचा घामटा काढणाऱ्या उष्णतेमुळे पोळून निघालेल्या पुणेकरांना (pune) आज चांगला दिलासा मिळाला. पुणे आणि बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात आज पावसाने (rain) जोरदार हजेरी लावली. आज संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या तुफान पावसाने पुणेकरांची एकच तारांबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे घरी जाणारे पुणेकर आहे त्या ठिकाणीच अडकून पडले. जोराचा वारा आणि तुफान पाऊस यामुळे अगदी काही क्षणातच पुण्यातील काही भागात पाणी साचले. तर या अवकाळी संकटामुळे वीज पुरवठाही खंडित झाला. त्यामुळे पुण्यातील काही भागात अंधाराचं साम्राज्य पसरलं आहे. पुणे, हडपसर आणि बारामतीसह (baramati) ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना आज संध्याकाळी अचानक वातावरणात गारवा जाणवू लागला. संध्याकाळच्या सुमारास काळेकुट्ट ढग जमा झाले होते. त्यानंतर पावसाच्या हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जमिनीतून उष्ण वाफा येऊ लागल्या. पावसाच्या सरी कोसळू लागल्याने पुणेकरही सुखावून गेला. पण त्यानंतर अचानक पावसाने जोर धरला. विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळल्याने पुणेकरांची प्रचंड तारांबळ उडाली. त्यामुळे पुणे शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. बारामती परिसरातही वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. या अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील जेजुरीसह आणि बारामती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासोबत पावसाच्या सरी बरसल्या. त्याचबरोबर बारामती शहरात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस झाला असून जोरदार वाऱ्यांसह गारांचा पाऊस डपला आहे. महाबळेश्वर बाजारपेठेत गारांचा खच जमला आहे. या मुसळधार पावसाने महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांची चांगलीच धांदल उडाली आहे. या झालेल्या पावसाचा महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक व्यापाऱ्यांना फटका बसला असून स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या:
Mahabaleshwar Rain : महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये गारांचा पाऊस! पर्यटकांची धांदल, स्ट्रॉबेरीलाही फटका
सावधान.. ! लहान मुलांनमध्ये वाढत आहे कोरोनाचे प्रमाण; ‘या’ 7 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका…