पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अखेर विजांच्या गडगडाटासह पाऊस (Pune Rain) दाखल झाला आहे. सकाळपासूनच पुण्यात ढग दाटून आले होते. अखेर दुपारच्या सुमारास पुणेकरांना या पावसाने भिजवले. मान्सून कोकणात रेंगाळला असून तो लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असे हवामान विभागाने (IMD) म्हटले होते. दरम्यान, केवळ अर्धा तास पडलेल्या पावसामुळे लक्ष्मी रस्त्यावर पाणी साठले. रस्त्यावर पाणी साठल्याने वाहतुकीला अडथळा, तर पायी जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडताना दिसून आली. पूर्व मान्सून (Pre monsoon) पावसाने राज्यात आधीच हजेरी लावली होती. पुण्यासह अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कोकणाला झोडपले होते. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला होता. तर शेतकरीदेखील आपल्या शेतीच्या कामाला लागला होता.
दुपारनंतर पुण्यात वातावरणातात बदल जाणवायला लागले होते. वातावरण ढगाळ झाले होते. संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटात मुसळधार पाऊस झाला. दुपारनंतरच्या पावसामुळे या मार्गिकेवरची वाहतूक धीमी झाली. गेल्या काही दिवसांपासून मावळ, लोणावळा परिसरात ढगाळ वातावरण होते. आज मात्र दमदार पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. लोणावळा, खंडाळा यांसह परिसरातील विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली.
साधारणपणे 11 जूनपासून ते 13 जून या तीन दिवसांत हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसणार, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. 15.6 मिमी ते 64.4 मिमी अशा सरासरीत तो पडेल, असे हवामान विभागाने सांगितले होते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील 17हून अधिक जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 11-13 जून या कालावधीत राज्यभर पावसाचे वातावरण असेल, असेही वेधशाळेने म्हटले होते. मान्सूनची प्रतीक्षा अद्याप असून अपेक्षेपेक्षा थोडा अधिक वेळ मान्सून घेत आहे, असे हवामान विभागाने सांगितले होते.